आरेत गेला महिनाभर धूमाकूळ घालणारा बिबट्या अखेर आज पहाटे 3 च्या सुमारास जेरबंद झाला आहे. आरे युनिट नंबर 3 मध्ये काल वनखात्याने पिंजरा लावून अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रात्री जागता पहारा ठेवला होता. यामुळे आता येथील नागरिकांना मोठा दिलासा मिळेल.
या बिबट्याला आज सकाळी सात वाजता संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात घेऊन गेले आहेत. त्याची वैद्यकीय तपासणी पण होणार असून आरेत धूमाकूळ घालणारा हाच तो बिबट्या असल्याची आम्ही शहानिशा करणार आहोत असं वनखात्याचे तळाशी येथील रेंज ऑफिसर दिनेश दिसले म्हणाले.
आरेत गेल्या महिनाभरात पाच जणांवर बिबट्याने हल्ला केल्यामुळे नागरिकांमध्ये भीती पसरली होती. 26 सप्टेंबर रोजी आयुष यादव या चार वर्षाच्या बालकावर बिबट्याने हल्ला केला होता, तर 28 सप्टेंबरला 64 वर्षीय महिलेवर हल्ला केला. मात्र या महिलेने हातातील काठीने प्रतिउत्तर देत पळवून लावले होते. तर काल रात्री आठच्या सुमारास आरे युनिट नंबर 7 येथे आपल्या मित्राला भेटायला गेलेला गोरेगाव पूर्वमधील संतोष नगर येथील तरुणावर बिबट्याने हल्ला केला.
आता बिबट्या जेरबंद झाला असला तरी येथील उर्वरित बिबट्यानादेखिल जेरबंद करावे अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते निलेश धुरी यांनी केली आहे.