"औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता. त्याच्या राजवटीत भारताची सीमा ही अफगाणिस्तान आणि बर्मा देशापर्यंत होती", असे वक्तव्य समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यावरुन वाद निर्माण झाला आहे. "औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता. त्याच्या काळात भारताला 'सोने की चिडीयाँ' म्हणायचे. औरंगजेबाच्या राजवटीत भारताचा जीडीपी 24 टक्के इतका होता. त्यामुळेच इंग्रज भारतात आले", असे अबू आझमी यांनी म्हटलं आहे. या वक्तव्यावरुन राजकीय वातावरण तापले आहे. राजकीय नेत्यांनी अबू आझमी यांच्या या वक्तव्यावरुन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आदित्य ठाकरे तसेच अंबादास दावने यांनी माध्यामांना आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
आझमी यांच्या वक्तव्यावरुन माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, "हे जे वक्तव्य करत आहेत ते कोणाची तरी सुपारी घेऊन करत आहेत. वाद निर्माण करायचा प्रयत्न करत आहे. महाराष्ट्रामध्ये वादाची ठिणगी पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचे मी आधीच सांगितले होते. आपल्याला आठवत असेल पोडियमच्यावेळी मी सांगितलं होतं की, कोणाचा इशारा येतो आणि कोणीही उठतं काहीही बोलतं. महत्त्वाची गोष्ट हीच आहे की, छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये असं कोणी वक्तव्य करत असेल त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे."
आझमी यांच्या वक्तव्यावरुन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, " औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना हाल करुन मारले. त्याचे उदात्तीकरण करणे हे अतिशय दुर्दैवी आहे. या वक्तव्याचा निषेध करु तेवढा कमी आहे. खरं म्हणजे अबू आझमी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. कारण छत्रपती संभाजी महाराजांनी देशासाठी आपले प्राण अर्पण केले आहेत. अबू आझमी यांच्या म्हणण्यानुसार औरंगजेब चांगला प्रशासक होता. औरंगजेबांचे कौतुक करणे हे तर महापाप आहे म्हणूनच अबू आझमी यांनी माफी मागितली पाहिजे. या वक्तव्यावर ज्यांनी पाठिंबा दिला तोच खरा देशद्रोह".
आझमी यांच्या वक्तव्यावरुन विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही प्रतिक्रिया देत म्हटले की, "औरंगजेब हा क्रुरकर्मा होता. त्याने संभाजी महाराजांना त्याने हाल करुन मारले. औरंगजेबाने मंदिर बांधली असतील तर त्याची यादी द्यावी. पंढरपूर, तुळजापूरपासून मंदिर पाडायला औरंगजेबांने सुरुवात केली होती. औरंगजेबाने संभाजी महाराजांना मारले त्यामुळे तो क्रुर कर्माच आहे. अबू आझमी हे काय मोठे इतिहासकार आहेत का?" विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी म्हटले आहे.