मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीमधील साई रिसॉर्टचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. साई रिसॉर्ट प्रकरणी लोकानियुक्तांनी अनिल परब यांचा या रिसॉर्टशी काही संबंध नसल्याचा निर्णय दिला आहे, अशी माहिती अनिल परब यांनी दिली आहे. खासदार किरीट सोमैय्या यांनी माझ्यावरती खोटे आणि राजकीय द्वेषापोटी आरोप केले होते, अशी टीका करत सोमैय्यांना नाक घासून माफी मागावी लागेल किंवा शंभर कोटी रुपये मला द्यावे लागतील, असे अनिल परब यांनी म्हंटले आहे.
अनिल परब म्हणाले की, खासदार किरीट सोमैय्या यांनी माझ्यावरती खोटे आरोप केले होते. साई रिसॉर्टच्या संदर्भात माझा कुठलाही संबंध नाही. मी साई रिसॉर्ट जमीन विकलेली होती आणि त्याचा माझा कुठलाही संबंध नाही आणि या संदर्भात माझ्यावर खोटे आरोप केले होते. त्यांनी राज्यपालांकडे माझी तक्रार केली होती. राज्यपालांनी लोकायुक्तांना निर्देश दिले होते आणि लोकायुक्तांच्या समोरची सुनावणी झाली. लोकायुक्तांच्या सुनावणीचा काल निर्णय आला आहे. लोकायुक्तांनी ही याचिका फेटाळून लावलेली आहे. लोकायुक्ताने स्पष्ट सांगितलेलं की अनिल परब यांचे या रिसॉर्टशी काही संबंध नाही. हे रिसॉर्ट सदानंद कदम यांचे आहे. हे मी सुरुवातीपासून सांगत होतो. माझ्यावरचे सगळे आरोप हे राजकीय द्वेषापोटी केले जातात, अशी टीका त्यांनी केली आहे.
तत्कालीन सरकारला बदनाम करण्यासाठी केले जातात आणि ज्या यंत्रणांनी हे केलं होतं तीदेखील सगळी चुकीच्या मार्गाने अशा प्रकारचे आदेश देते आहे. हे या लोकायुक्तांच्या आदेशाने आज सिद्ध झालेले आहे. त्यामुळे मी किरीट सोमय्या यांच्यावरती जो शंभर कोटीच्या मानाचा दावा केला होता. त्यांना सांगितलं होतं एकतर तुम्हाला नाक घासून माफी मागावी लागेल किंवा शंभर कोटी रुपये मला द्यावे लागतील. हे प्रकरण फक्त आता उच्च न्यायालयात बाकी आहे. त्याच्यात देखील मला इंटरियम स्टे मिळालेला आहे. त्यामुळे किरीट सोमैय्या यांच्यावरचा दावा हा माझा अतिशय मजबूत होतोय. पुन्हा एकदा मी न्यायालयाकडे जाईल आणि न्यायालयाला सांगेल की या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण किरीट सोमैय्या यांना योग्य ती शिक्षा द्यावी, असे त्यांनी म्हंटले आहे.