राजकारण

शशी थरुर यांना पाठिंबा देण्यासाठी आशिष देशमुखांचे खुले पत्र; म्हणाले, हाय कमांड कल्चर...

कॉंग्रेस अध्यक्ष पदासाठी निवडणूकीत शशी थरुर विरुनध्द मल्लिकार्जुन खर्गे अशी लढत होत. आहे. दोन्ही गट निवडणुकीचा जोरदार प्रचार करत आहेत.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

कल्पना नालस्कर | नागपूर : कॉंग्रेस अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शशी थरुर विरुध्द मल्लिकार्जुन खर्गे अशी लढत होत. आहे. दोन्ही गट निवडणुकीचा जोरदार प्रचार करत आहेत. अशातच कॉंग्रेस नेते आशिष देशमुख यांनी शशी थरुर यांच्या समर्थनार्थ खुले पत्र लिहीले आहे. नव्या दमाचे, नव्या उमेदीचे, नव्या संभावनेचे नेते डॉ. शशी थरूर हेच आहेत. मोदी जाळातून बाहेर निघण्याचा मार्ग म्हणजे गेम चेंजर डॉ. शशी थरूर हेच आहेत, असे त्यांनी म्हंटले आहे.

काय आहे आशिष देशमुख यांचे पत्र?

गांधी कुटुंब या पारदर्शी निवडणूकीपासून अलिप्त राहणार असून तब्बल २४ वर्षांनी गांधी कुटुंबाबाहेरील व्यक्ती कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी विराजमान होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, ही स्वागतार्ह बाब आहे. पक्षात विकेंद्रीकरणासाठी हे महत्वाचे पाऊल असून कॉंग्रसचे भविष्य उज्ज्वल आहे. राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते श्री. मल्लिकार्जुन खर्गे आणि ‘जी-२३’ गटाचे खासदार डॉ. शशी थरूर यांच्यात सरळ लढत होणार आहे. थरूर उच्चशिक्षित व अभ्यासू खासदार आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांचे काम आहे. ३० सप्टेंबरला नवी दिल्ली येथे डॉ. शशी थरूर यांनी कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी नामांकन भरले, त्यांच्या समर्थनार्थ त्यावेळी मी त्यांच्यासोबत होतो. १२ राज्यांतील कॉंग्रेस समर्थकांनी त्यांना खुले समर्थन दिले आहे. विदर्भातून त्यांच्या प्रचाराचा श्रीगणेशा व्हावा म्हणून मी त्यांचा २ दिवसांचा दौरा आखला. ०१ ऑक्टोबरला नागपूर येथील दीक्षाभूमी येथे महामानव डॉ. बाबासाहेबांना अभिवादन करून व बाबासाहेबांवर लिहिलेले पुस्तक समर्पित करून त्यांनी प्रचाराला सुरुवात केली. ०२ ऑक्टोबर, गांधी जयंतीला सेवाग्राम येथील गांधी आश्रम तसेच इंदिराजींचे मार्गदर्शक विनोबा भावे यांच्या पवनार येथील पावन स्मृतीस अभिवादन करून त्यांनी नागपूर येथे कॉंग्रेसचे विविध पदाधिकारी, नेते व कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या. येणाऱ्या १७ ऑक्टोबरला त्यांचा कॉंग्रेस अध्यक्षपदाचा विजय निश्चित व्हावा, अशी आम्हां सामान्य कार्यकर्त्यांची इच्छा आहे. डॉ. शशी थरूर यांचे पक्षातील सर्वांशी सलोख्याचे संबध आहेत. पक्षाला नवी दिशा दाखविण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे. त्यानिमित्याने, पक्षाला नव्या ताकदीने पुढे नेऊन देशात कॉंग्रेसला सत्तेत आणण्याची जबाबदारी ते समर्थपणे सांभाळू शकतील, असा विश्वास आहे.

खूप वर्षे झालीत, कॉंग्रेस पक्ष एकाच ठिकणी थांबला असल्याचे दिसते. या पॉस (pause) ला फास्ट फॉरवर्ड करण्यासाठी, कॉंग्रेस पक्षाला प्रशासकीय अडचणींतून बाहेर काढण्यासाठी आणि कॉंग्रेसमध्ये गुणात्मक परिवर्तनासाठी डॉ. शशी थरूर हवे आहेत. फ़क़्त पक्षासाठीच नव्हे तर सामान्य कार्यकर्त्यांसाठीसुद्धा डॉ. शशी थरूर हवे आहेत. पक्षाची सध्याची परिस्थिती व कार्यपद्धतीतून बाहेर निघण्यासाठी डॉ. शशी थरूर हेच एकमेव पर्याय आहेत. इंदिराजींच्या काळात संपूर्ण विदर्भ कॉंग्रेससोबत होता. गावागावांतून कार्यकर्त्यांचे कॉंग्रेसला समर्थन होते. परंतु, त्यानंतर परिस्थिती बदलली. देशातील प्रत्येक राज्यात कॉंग्रेसची सत्ता येणे गरजेचे असून कॉंग्रेसच देशाला प्रगतीच्या शिखरावर नेऊ शकते. नागपूरमध्ये ज्या विचारधारेद्वारा समाजाला विविध जाती-धर्मात विभागण्याचा प्रयत्न केल्या जात आहे, त्या आरएसएस मुख्यालय असलेल्या नागपूरमधून एक चांगला मेसेज जनतेपर्यंत पोहोचेल आणि एक नवी दिशा मिळेल. ही गांधीजींना व बाबासाहेबांना मानणारी भूमी आहे, ही हेगडेवार व सावरकरांना मानणारी भूमी नव्हे. कॉंग्रेस एक होवो, शक्तिशाली होवो, परिवर्तनाकडे वाटचाल करो हीच आशा आम्हांसारख्या लहान कार्यकर्त्याची डॉ. शशी थरूर यांच्याकडून आहे. हे गुणात्मक परिवर्तन ते कॉंग्रेसच्या कार्यप्रणालीमध्ये निश्चितच आणतील. यासाठी मला कॉंग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांना, नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना हेच सांगायचे आहे की, नव्या दमाचे, नव्या उमेदीचे, नव्या संभावनेचे नेते डॉ. शशी थरूर हेच आहेत. मोदी जाळातून बाहेर निघण्याचा मार्ग म्हणजे गेम चेंजर डॉ. शशी थरूर हेच आहेत.

कॉंग्रेस पक्ष युवकांचा पक्ष आहे. देशातील ५२% लोकं २५-३० वयोगटाच्या खालील आहेत. या युवावर्गाला कॉंग्रेस नकोशी झाली आहे का, असा विचार आमच्या मनात येत आहे. या युवावर्गाला कॉंग्रेस व कॉंग्रेसच्या विचारधारेशी जोडण्याचे काम डॉ. शशी थरूरच करू शकतात; त्यामुळे इतर विचारधारेशी जुळलेला युवावर्ग आणि लोकंसुद्धा कॉंग्रेसच्या विचारधारेशी जुळू शकतात. पक्षाला सध्या मेजर सर्जरीची गरज आहे, त्यासाठी डॉ. शशी थरूर हे चांगले सर्जन सिध्द होऊ शकतात. खर्गे यांच्या समर्थनार्थ मोठे नेते आहेत पण थरूर यांच्या समर्थनार्थ माझ्यासारखे सामान्य कार्यकर्ते असल्यामुळे ही लढत नेते विरुध्द सामान्य कार्यकर्ते अशी दिसत आहे. युवा कार्यकर्त्यांची प्रेरणा म्हणून थरूर आहेत. त्यांच्या जाहीरनाम्यात ‘हाय कमांड कल्चर’ संपविण्याचा मुद्दा आहे. खालपासून वरपर्यंत बदलाचे मुद्दे यात समाविष्ट आहे. भूतकाळाकडे न बघता भविष्याकडे बघावे, म्हणूनच थरूर हेच सर्वांची पहिली पसंती आहे.

इंदिराजींनी व्हीव्ही गिरी व नीलम संजीव रेड्डी यांच्या निवडणुकीच्या वेळी कॉंग्रेसजनांना आवाहन केले होते की, आपण सद्सदविवेकबुद्धीला जागृत करून गुप्त मतदान करावे. सोनियाजींनी सुद्धा २००४ मध्ये म्हटले होते की, आपल्या अंतरात्म्याला विचारून पंतप्रधान पदाचा त्याग करत आहे. त्याचप्रमाणे कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी व नेत्यांनी आपल्या अंतरात्म्याला विचारायचे हवे की, कोणता उमेदवार चांगला आहे; शशी थरुर हेच उत्तर असेल. कॉंग्रेस कार्यकर्त्यांच्या करीअरसाठी- उज्ज्वल भविष्यासाठी डॉ. शशी थरूर यांची गरज आहे. कॉंग्रेसचे पदाधिकारी, नेते व कार्यकर्ते यांना मी नम्र आवाहन करीत आहे की, कॉंग्रेस अध्यक्षपदासाठी डॉ. शशी थरूर यांना पाठींबा द्यावा आणि ते जिंकून येतील यासाठी प्रयत्न करावेत, जेणेकरून कॉंग्रेसचे व कार्यकर्त्यांचे भविष्य उज्ज्वल करता येईल. जिंकणार जरूर, शशी थरूर, असा विश्वासही आशिष देशमुखांनी शेवटी व्यक्त केला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : काल एक गद्दार काल बोलला 'जय गुजरात' - उद्धव ठाकरे

Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : "मराठी शिकणारे शिक्षणमंत्री इंग्रजीमध्ये शिकणारा मुख्यमंत्री..." राज ठाकरेंचा नाव न घेता टोला

Raj Thackeray Live : 'जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलंय'; राज ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांना टोला

Raj-Uddhav Thackeray Family Member Vijayi Melava : सहकुटुंब सहपरिवार..; ठाकरे बंधूंचे कुटुंब एकाच व्यासपीठावर