मुंबई : राज्यात सध्या प्रचंड राजकीय वातावरण तापलेले असताना, याच गोष्टीचा फायदा घेत सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. अशातच काल माजी. मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मेळावा पार पडला. हा मेळावा पार पडताच शिवसेनेला बंडखोरीनंतर ज्या ठिकाणी सर्वाधिक धक्का बसला त्या औरंगाबादमध्ये शिवसेनेत मोठी इन्कमिंग झाली आहे.
औरंगाबादमध्ये शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष विजयराव साळवे यांनी मातोश्री येथे जाऊन शिवबंधन बांधून घेतले आहे. विशेष बाब म्हणजे औरंगाबादमधील अनेक सामाजिक संघटनातील नेत्यांनी देखील शिवसेनेत प्रवेश केला आहे. औरंगाबाद युवा उदयोजक संघर्ष सोनावणे, सरपंच जितेंद्र जगदाळे, उपसरपंच महेंद्र खोतकर, वाल्मीकी समाज जिल्हाध्यक्ष विक्की चावरीया अशा सर्व पक्ष, संघटनाच्या नेत्यांनी असंख्य कार्यकर्त्यांसोबत शिवसेनेत प्रवेश केला आहे.
औरंगाबाद शिवसेनेत झालेल्या या प्रवेशामुळे शिवसेनेचे बळ वाढणार असल्याचे दिसत आहे. यावेळी औरंगाबाद माजी खासदार शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते आमदार. अंबादास दानवे, संपर्क प्रमुख. विनोद घोसाळकर, आमदार. उदयसिंग राजपूत यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.