राजकारण

बाळासाहेब महाराष्ट्रात जन्मलेले स्वाभिमानाचे हिमालय; शिवसेनेकडून स्मृतींना उजाळा

हिंदुहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आज 10 वा स्मृतीदिन आहे. यानिमित्त शिवसेनेने सामना आग्रलेखातून त्यांना अभिवादन केले आहे

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : हिंदुहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आज 10 वा स्मृतीदिन आहे. यानिमित्त शिवसेनेने सामना आग्रलेखातून त्यांना अभिवादन केले आहे. बाळासाहेब हे महाराष्ट्रात जन्मलेले स्वाभिमानाचे हिमालय होते. त्या हिमालयाच्या शिखरावर फक्त भगवाच आहे! जगाच्या इतिहासातील अमर महापुरुषांच्या श्रेणीत बाळासाहेबांचे स्थान अढळ आहे. त्यांचे योद्धेपण इतिहासात अधिक तेजाने तळपत राहील, असे शिवसेनेने म्हंटले आहे.

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज दहावा स्मृतिदिन. संकटांचे पहाड कोसळले तरी त्या संकटांच्या छाताडावर पाय रोवून उभे राहणारे त्यांचे नेतृत्व. अनेक वाद, वादळे आणि वावटळी त्यांनी अंगावर घेतल्या व परतवून लावल्या. मनुष्याचे अंतरंग स्पष्टपणे व्यक्त होण्याची वेळ आणि त्याच्या खऱया कसोटीचा प्रसंग म्हणजे संकट. त्या वेळी तेजस्वी पुरुष हताश होऊन स्वस्थ बसत नाहीत. शिवसेनाप्रमुखांच्या बाबतीतही तेच घडले. ज्या महाराष्ट्राच्या मातीचे, ‘मराठी’ समाजाचे आपण घटक आहोत, तो महाराष्ट्र, मराठी समाज विस्कळीत झाला आहे. त्याला राजदरबारात पिंमत नाही. त्याला सार्वजनिक मत नाही. त्याला रोज अपमान आणि अवहेलनेस सामोरे जावे लागत आहे. ‘स्वाभिमान’ आणि ‘तेज’ या शब्दांशी त्याचा काही संबंध उरलेला नाही. त्याला रोज लाथाडले जात आहे, हे बाळासाहेबांनी पाहिले, मनावर घेतले. परिणामी मराठी माणूस व महाराष्ट्रावरील अन्यायाविरुद्ध लढायचे आणि त्यासाठी शिवसेनेच्या विचारांची मशाल धडधडत ठेवायची हेच आपले ध्येय असे त्यांनी ठरवून टाकले. ते ध्येय साध्य करण्यासाठी आपण आमरण झटत राहावयाचे असा त्यांनी त्या वेळी निर्धार केला. त्याच निर्धाराने ते लढत राहिले. शिवसेनेला लढत ठेवले व शेवटी लढता लढता एका महान योद्धय़ाप्रमाणे त्यांनी आपला देह ठेवला.

छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वाभिमानी बाणा व प्रखर हिंदुत्वाचा विचार शिवसेनाप्रमुख पुढे पुढेच घेऊन गेले. महाराष्ट्र म्हणजे दिल्लीच्या पायरीवरचे एक पायपुसणेच झाले होते. मराठी माणसांचा रामा गडी करून ठेवला होता. मोगलांनी आणि इंग्रजांनी आमच्या देशाची लूट केली तशीच लूट मुंबईसह महाराष्ट्राची सुरू होती. त्या वेळी बाळासाहेबांच्या विचारांची वीज कडाडली व संपूर्ण महाराष्ट्र त्या विचाराने उजळून निघाला. तो प्रकाश, ते तेज आजही कायम आहे. बाळासाहेबांनी निर्माण केलेल्या सूर्यावर थुंकण्याचे प्रयत्न आजपर्यंत काय कमी झाले? मात्र त्या सगळ्यांना शिवसेना पुरून उरली. आता शिवसेनेचा सूर्य गिळण्याचा प्रयत्न सुरू झाला, पण या सूर्याच्या प्रखर तेजाने दुश्मन जळून खाक होईल. कालचे वर्ष व आजचे वर्ष यात मोठा फरक आहे. शिवसेना ही प्रखर राष्ट्राभिमानी, राष्ट्रीय बाण्यासाठी लढणारी संघटना आहे. या संघटनेचे सेनापती बाळासाहेब ठाकरे होते व आजही आहेत.

लोकांची आजही शिवसेनेवर श्रद्धा आहे. त्या शिवसेनेचे नेतृत्व उद्धव बाळासाहेब ठाकरे करीत आहेत. बाळासाहेब ठाकरे यांचे व्यक्तिमत्त्वच अचाट आणि अफाट होते. बाळासाहेबांना ज्याप्रमाणे कट्टर विरोधक भेटले त्याप्रमाणे त्यांच्यावर अफाट प्रेम करणारेही असंख्य होते. विरोधकही त्यांच्यावर प्रेमाचा आणि स्तुतीचा वर्षाव करीत. बाळासाहेबांचे व्यक्तित्व होतेच तसे. अशा बाळासाहेबांच्या विचाराने महाराष्ट्र आणि देश आजही भारावलेला आहे. लाखो निष्ठावान शिवसैनिक आज बाळासाहेबांचा जयजयकार करतील. त्यांच्या विचारांच्या पेटत्या मशालीसमोर नतमस्तक होतील. बाळासाहेब हे महाराष्ट्रात जन्मलेले स्वाभिमानाचे हिमालय होते. त्या हिमालयाच्या शिखरावर फक्त भगवाच आहे! जगाच्या इतिहासातील अमर महापुरुषांच्या श्रेणीत बाळासाहेबांचे स्थान अढळ आहे. त्यांचे योद्धेपण इतिहासात अधिक तेजाने तळपत राहील, असे शिवसेनेने म्हंटले आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा