राजकारण

महाराष्ट्रानंतर बिहारमध्ये भूकंप! नितीश कुमारांनी सोडली भाजपची साथ; राजीनामा देणार

महाराष्ट्रानंतर आता बिहारमध्ये राजकीय भूकंप झाला आहे. बिहारमध्ये राजकीय हालचाली वाढल्या आहेत. जेडीयू आज भाजपसोबतची युती तोडण्याची घोषणा करून तेजस्वी यादव यांच्या आरजेडीसोबत सरकार स्थापन करू शकते.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

पाटणा : महाराष्ट्रानंतर आता बिहारमध्ये राजकीय भूकंप झाला आहे. बिहारमध्ये राजकीय हालचाली वाढल्या आहेत. जेडीयू आज भाजपसोबतची युती तोडण्याची घोषणा करून तेजस्वी यादव यांच्या आरजेडीसोबत सरकार स्थापन करू शकते. यासाठी नितीश कुमार यांनी राज्यपाल फगू सिंह चौहान यांची भेट घेण्यासाठी वेळ मागितली आहे. जेडीयूच्या काही नेत्यांसह मुख्यमंत्री राजभवनात जाणार आहेत. राजभवनाजवळ पोलिसांनी बॅरिकेड लावले आहेत. तगडा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.

बिहारमध्ये सत्तांतराच्या पार्श्वभूमीवर आरजेडी नेते तेजस्वी यादव यांच्या घरी महाआघाडीची बैठक सुरू आहे. त्याचबरोबर जेडीयूनेही आपल्या आमदारांची बैठक बोलावली असून राज्यपाल फागू चौहान यांना भेटण्यासाठी वेळ मागितली आहे. येथे आरजेडी, काँग्रेस आणि डाव्या पक्षांनी नितीश सरकारला पाठिंबा देण्यासाठी पत्र तयार केले आहे. या पत्रावर विरोधी पक्षाच्या आमदारांच्या सह्या घेण्यात आल्या आहेत. मात्र, नितीशकुमार यांच्या नव्या सरकारमध्ये सीपीआय (एमएल)चा समावेश होणार नसल्याची माहिती समजत आहे.

नितीश कुमार हेच महाआघाडीचे मुख्यमंत्री असतील. सर्व काही सेटल झाले आहे, असे काँग्रेसचे आमदार शकील अहमद खान यांनी म्हटले आहे. तर, तेजस्वी यादव गृहमंत्री बनण्याची शक्यता आहे. आजच जेडीयू पत्रकार परिषद घेणार असून युतीसंबंधी घोषणा करण्याची शक्यता आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीश मंत्रिमंडळात समाविष्ट भाजप कोट्यातील मंत्र्यांची हकालपट्टी होऊ शकते. मुख्यमंत्री यासंदर्भात राज्यपालांना पत्र देऊ शकतात. नितीश मंत्रिमंडळात सध्या 2 उपमुख्यमंत्र्यांसह भाजप कोट्यातील 16 मंत्री आहेत. युती तुटल्यानंतर नितीश कुमारही आता फ्लोर टेस्ट घेण्याची तयारी करत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व आमदारांना पुढील 72 तास पाटण्यात राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. बिहार विधानसभेत जेडीयूचे ४५ आमदार आहेत.

दरम्यान, बिहार विधानसभा निवडणूक 2020 जेडीयू आणि भाजपने एकत्र लढवली होती. कमी जागा मिळूनही भाजपने नितीशकुमार यांना मुख्यमंत्री केले. तेव्हापासून दोन्ही पक्षांमध्ये बाचाबाची सुरू होती. दोन्ही पक्षांचे नेतेही अनेक मुद्द्यांवर वेगवेगळी वक्तव्ये करताना दिसले. या वादाचं कारण म्हणजे प्रादेशिक पक्षांना डावलण्याची भाजपची भूमिका. बिहारमध्ये सुद्धा महाराष्ट्रासारखी परिस्थिती निर्माण झाली आणि जसं उद्धव ठाकरेंना डावललं तसं आपल्यालाही डावललं गेलं तर काय? ही चिंता नितीश कुमारांना सतावत असल्याचं दिसतंय. त्यामुळे काल त्यांच्या एका सहकार्‍यानं जाहीर वक्तव्य करून भाजप आमचा पक्ष फोडण्याचं काम करत असल्याचा आरोप केला आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा