राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी नुकताच काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते. या विधानामुळे राज्यात त्यानंतर एकच राजकीय गदारोळ सुरु झाला. विरोधकांनी या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि राज्यपाल यांना चांगलेच धारेवर धरले आहे. राज्यपालांना हटविण्यासाठी विरोधकांनी सरकारवर दबाव वाढविला आहे. राज्यपालांना दोन-चार दिवसांमध्ये न हटविल्यास ‘महाराष्ट्र बंद’सारखे आंदोलन छेडले जाईल, असा इशारा शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला. यावरच आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
काय दिले बावनकुळेंनी ठाकरेंना प्रत्युत्तर?
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर देतांना म्हणाल्या की, “राज्यपाल यांच्याबद्दल या पद्धतीने बोलणं योग्य नाही. कोणत्याही चुकीच्या गोष्टीचे आम्ही समर्थन करत नाही. राज्यपालांचे वय आणि वृद्धाव्यस्था काढणे बरोबर नाही. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी हीच संस्कृती शिकवली का?,” असा सवाल बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंना केला आहे.
काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?
राज्यपालांच्या वादग्रस्त विधानावर बोलताना काल उद्धव ठाकरे माध्यमांशी बोलताना म्हणाले की, “महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांना मानतो. पण, त्यांचा अपमान झाल्यावर भाजपाकडून गुळगुळीत प्रतिक्रिया दिल्या जातात. केंद्रात ज्यांचं सरकार आहे, त्यांच्या विचारांची माणसं राज्यपाल म्हणून नेमली जातात. या माणसांची कुवत काय असते, यांची पात्रता काय असते? वृद्धाश्रमात जागा नाही म्हणून राज्यपाल करता का? बाप हा बाप असतो, नवा की जुना असा प्रश्न नसतो. हे सॅम्पल वृद्धाश्रमात पाठवा, अन्यथा आम्ही आमच्या पद्धतीने पाठवू,” असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला होता.