भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी मॉडेल उर्फी जावेद यांच्यामध्ये सध्या जोरदार शाब्दिक युद्ध सुरु आहे. उर्फीच्या कपड्यावर चित्रा वाघ यांनी आक्षेप घेतल्यानंतर त्यामध्ये प्रचंड वाद निर्माण झाला आहे. उर्फीने काही दिवसांपूर्वी चित्रा वाघ यांना ट्विटरवरून डिवचले होते. त्यामुळे हा वाद थांबण्याचे नाव घेत नाहीय. त्यातच आज चित्रा वाघ ह्या परभणीत दौऱ्यावर होत्या. त्यावेळी त्यांनी पुन्हा उर्फीविरुद्ध लढा चालू ठेवण्याचे सांगितले आहे.
काय म्हणाल्या चित्रा वाघ?
एका विकृतीविरोधात मी बोलले तर माझ्या विरोधात सगळे एकत्र झाले. माझ्या मुलांचे फोटोदेखील व्हायरल केले. कुणाला काय करायचे ते करू द्या. मात्र, मी माझ्या भूमिकेवर ठाम असून तिला अटक होऊन तिच्यावर कारवाई होऊन जोपर्यंत ती पूर्ण कपडे घालत नाही तोपर्यंत मी गप्प बसणार नाही. असे त्या म्हणाल्या.
राज्यात अशा प्रकारे ही विकृती उघडे नागडे फिरते आणि मी याबाबत आवाज उठवला तर काय चूक केले असा सवाल त्यांनी केला. कुणात किती हिम्मत आहे, तेवढ्या हिमतीने माझ्या विरोधात बोलावं आणि काम करावं. मी सर्वांना पुरून उरेल असा इशारा देखील चित्रा वाघ यांनी यावेळी दिला.