राज्यात सध्या प्रचंड राजकीय गदारोळ सुरु आहे. त्यातच मागील काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर आणि कार्यालयावर ईडीने छापेमारी केली होती. त्यानंतर या छापेमारीमुळे राजकीय वर्तुळात एकच गदारोळ निर्माण झाला होता. दरम्यान, भाजप नेते किरीट सोमय्या आज कोल्हापुरात दाखल झाले. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेत हसन मुश्रीफ यांच्यावर जोरदार निशाणा साधला. सोबतच सोमय्या यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार आणि ठाकरे गट प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर देखील टीका केली आहे.
नेमकं काय म्हणाले सोमय्या?
मुश्रीफ यांच्यावर ईडीची छापेमारी झाली. त्यानंतर त्यांनी एका समाजाला धरून ही कारवाई केली जात आहे. असा आरोप केला होता. त्यावरच आता यावरच बोलताना सोमय्या म्हणाले की, शरद पवार यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी असे विधान करावे. शरद पवार यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी सांगाव की, हसन मुश्रीफ यांचं विधान मला मान्य आहे. उद्धव ठाकरे हे दोन्ही हातात हिरवा झेंडा घेऊन फिरतात. त्यांनीसुद्धा असे विधान करावे, असे आव्हानच त्यांनी यावेळी दिले.
पैसे चोरताना, घोटाळा करताना, ग्रामपंचायतींवर कर लावताना, इतरांच्या नावानं भ्रष्टाचाराचा पैसा पार्किंग करताना तुम्हाला धर्म आठवला नव्हता का? आता तुम्हाला धर्म आठवतो का. कोल्हापुरात मातेचं दर्शन करायला येत होता. तेव्हा कोल्हापुरात यायला बंदी घातली होती. मंदिरात प्रवेश करताना अटक केली होती. त्यावेळी तुम्हाला धर्म नाही आठवला का? असा थेट सवालच त्यांनी यावेळी केला. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सहयोगी रोज उठून मला प्रश्न विचारत होते. त्यांना मी उत्तर देत होतो. भावना गवळी, प्रताप जाधव यांनी घोटाळे केले असतील, तर तुमचा आशिर्वाद असेल, असे देखील सोमय्या यावेळी म्हणाले.