औरंगाबाद : औरंगाबाद येथे आज शिंदे गटाचे आमदार संदीपान भुमरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भव्य सभा आयोजित केली होती. यावेळी राष्ट्रवादी कॉग्रेस नेत्या सुप्रिया सुळे यांच्या टीकेचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समाचार घेतला आहे. टीका करणं त्याचं काम आहे आणि विकासाचं काम करणं आमचं काम आहे, असा टोला त्यांनी लगावला आहे.
एकनाथ शिंदे म्हणाले, आधी अजित पवार टीका करत होते. आता सुप्रिया सुळेही करतात. पण टीका करणं त्याचं काम आहे आणि विकासाचं काम करणं आमचं काम आहे. सुप्रिया सुळे म्हणतात, अजित पवार सकाळी सहा वाजता उठून काम करतात. पण, हा एकनाथ शिंदे सकाळी सहा वाजेपर्यंत काम करतो. त्यात मी खंड पडू देणार नाही, हा माझा शब्द आहे. तुम्हाला चिंता का पडली आहे. त्यांचा रिमोट काढून घेतल्याने त्यांना चिंता होत आहे, अशा शब्दात एकनाथ शिंदेंनी सुप्रिया सुळेंवर निशाणा साधाला आहे.
आपल्यातला माणूस वाटतो तेव्हाच माणूस फोटो काढायला येतात. काहींच्या आजूबाजूला माणसे फिरकतही नाही. काही म्हणतात राज्याला दोन मुख्यमंत्री पाहिजे. पण, मी कॅमेरासोबत नेता येईल अशाच ठिकाणी जातो, असे प्रत्युत्तरही मुख्यमंत्री शिंदे यांनी सुप्रिया सुळेंना दिले आहे. तसेच, घरच्यांचा गाठीभेटी घेतात, असे काही जण म्हणतात. पण, ती माझीच माणसे आहेत. मी नाही गेलो तर ते म्हणतील मी बदललो. तसेच, मी माझ्यातील कार्यकर्ता कधीही मरू देणार नाही, असेही शिंदेंनी म्हंटले आहे.
दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी या सरकारच्या फक्त गाठीभेटी आणि गृहभेटी सोडून फारशा काही बातम्या दिसत नाहीत. तसेच त्यांचे जे दौरे दिसतात ते सुद्धा एक किलोमीटरच्या आतले असतात. ज्या ज्या वेळी मी टीव्ही बघते तेव्हा मला मुख्यमंत्री कुणाच्या तरी घरीच दिसतात. दोन-दोन मुख्यमंत्री पाहिजेत. एक प्रशासनाला आणि एक फिरायला, असा टोमणा शिंदे सरकारला मारला होता.