Chhatrapati Sambhajinagar : धनगर विद्यार्थ्यांच्या शिक्षण योजनेत भ्रष्टाचार; दोन शाळांची मान्यता रद्द, अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई
धनगर समाजातील गरीब विद्यार्थ्यांसाठी सुरू असलेल्या राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शिक्षण योजनेत मोठा गैरव्यवहार उघडकीस आला आहे. याप्रकरणी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दोन शाळांची मान्यता तात्काळ रद्द करण्यात आली आहे. तसेच तत्कालीन शासकीय अधिकाऱ्यांविरोधात शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
कोणत्या शाळांवर कारवाई?
छत्रपती संभाजीनगर येथील स्वामी विवेकानंद ग्लोबल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, आसेगाव आणि गॅलेक्सी इंटरनॅशनल स्कूल या दोन शाळांवर ही कारवाई करण्यात आली आहे. यापैकी स्वामी विवेकानंद स्कूलसाठी 100 विद्यार्थ्यांच्या वसतिगृह मान्यतेसह अनुदान मिळाले होते. मात्र प्रत्यक्ष पाहणीत शाळेत एकही विद्यार्थी उपस्थित नव्हता. वसतिगृह अस्तित्वात नव्हते, संगणक खोली बंद अवस्थेत होती. संपूर्ण व्यवहार केवळ कागदोपत्री सुरू असल्याचे आढळून आले. गॅलेक्सी इंटरनॅशनल स्कूलमध्येही अशीच परिस्थिती असल्याचे निष्पन्न झाले.
या प्रकरणाचा उघडकीस आलेला भाग केवळ छत्रपती संभाजीनगरपुरता मर्यादित नसून, राज्यभर योजनेचा गैरवापर झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. काही संस्थाचालकांनी बनावट विद्यार्थ्यांच्या नावाने अनुदान घेतल्याची माहिती पुढे आली आहे.
या प्रकाराची गंभीर दखल घेत राज्याचे मंत्री अतुल सावे यांनी दोन्ही शाळांची मान्यता रद्द करण्याचा निर्णय घेतला. तसेच, संबंधित काळातील सहाय्यक संचालकांविरोधात शिस्तभंगाची कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. प्रादेशिक उपसंचालकांकडून याबाबतचा सविस्तर खुलासा मागवण्यात आला आहे.
या योजनेच्या नावाखाली चाललेला हा प्रकार केवळ अनुदान हडप करण्यापुरता मर्यादित नसून, धनगर समाजातील गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या हक्कावर घाला घालणारा असल्याची टीका होत आहे. योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना मोफत निवासी शिक्षण देण्याचे उद्दिष्ट असतानाही, केवळ कागदोपत्री शाळा दाखवून निधीची लूट सुरू होती. सध्या या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, इतर जिल्ह्यांतील शाळांमध्येही अशाच प्रकारचा गैरव्यवहार झाल्याचा संशय तपास यंत्रणांकडून तपासला जात आहे.