केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज 2023-24 साठी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. यावेळी निर्मला सीतारमण यांनी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. पुढील वर्षी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी या सरकारचा हा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प आहे. मात्र, दुसरीकडे या अर्थसंकल्पावरून समर्थन- विरोध सुरु असताना आता राज्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी या अर्थसंकल्पाचे कौतुक केलं आहे. रोजगार निर्मिती, शेतकरी, कामगार, महिला, युवक अशा सर्व घटकांना न्याय देणारा हा सर्वसमावेशक अर्थसंकल्प असून या अर्थसंकल्पाचे मी मनापासून स्वागत करतो. असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
काय म्हणाले मुख्यमंत्री शिंदे?
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदीय अर्थसंकल्पीय अधिवेशनात देशाचा वार्षिक अर्थसंकल्प सादर केला. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारने 'सबका साथ,सबका विकास' या घोषणेनुसार अर्थसंकल्पात समाजातील प्रत्येक घटकाला दिलासा मिळाला आहे.
पुढे ते म्हणाले की, गरिबांना आधार, मध्यमवर्गीयांना दिलासा, उद्योगांना उभारी आणि पायाभूत सुविधांना उत्तेजन देणारा हा अर्थसंकल्प आहे. रोजगार निर्मिती, शेतकरी, कामगार, महिला, युवक अशा सर्व घटकांना न्याय देणारा हा सर्वसमावेशक अर्थसंकल्प असून या अर्थसंकल्पाचे मी मनापासून स्वागत करतो. देशाच्या आणि राज्याच्या सर्वांगिण विकासाला या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून चालना मिळणार असल्याने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच अर्थमंत्री श्रीमती निर्मला सितारामन यांचे मी मनापासून अभिनंदन करतो.