राजकारण

फडणवीसांचा ड्रीम प्रोजेक्ट 'जलयुक्त शिवार' पुन्हा सुरु होणार; शिंदे सरकारची मंजुरी

महाविकास आघाडीच्या काळात बंद करण्यात आलेली उपमुख्यमंत्री देवेंद्र फणडवीस यांची महत्वकांक्षी योजना जलयुक्त शिवार पुन्हा सुरु करण्याचा निर्णय शिंदे सरकारने घेतला

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : महाविकास आघाडीच्या काळात बंद करण्यात आलेली उपमुख्यमंत्री देवेंद्र फणडवीस यांची महत्वकांक्षी योजना जलयुक्त शिवार पुन्हा सुरु करण्याचा निर्णय शिंदे सरकारने घेतला आहे. एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यापूर्वी जलयुक्त शिवार अभियान २०१५-२०१९ या कालावधीत राबविण्यात आले होते व ३९ लाख हेक्टर शेतीसाठी सिंचनाच्या सुविधा निर्माण झाल्या होत्या. आता नव्याने सुरु होणार असणाऱ्या या अभियानात येत्या ३ वर्षात सुमारे ५ हजार गावे नव्याने समाविष्ट केली जातील.

जलयुक्त शिवार अभियान २२ हजार ५९३ गावात राबविण्यात आले व यामध्ये ६ लाख ३२ हजार ८९६ कामे पूर्ण झाली. तसेच २० हजार ५४४ गावे जल परिपूर्ण झाली. या कामांमुळे २७ लाख टीसीएम पाणीसाठा क्षमता निर्माण झाली. तसेच कृषीचे विशेषत: रब्बीतील उत्पादनही वाढले. जलयुक्त शिवार अभियान टप्पा-२ मध्ये प्रथम टप्प्यातील पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम न राबविलेल्या पात्र गावांमध्ये मृद व जलसंधारणाची कामे घेण्यात येतील. त्याचप्रमाणे ज्या गावांमध्ये जलयुक्त शिवार अभियानाचा पहिला टप्पा राबविला गेला आहे पण अद्याप गावांमध्ये पाण्याची गरज आहे तेथे देखील ही कामे लोकसहभागातून करण्यात येतील.

या अभियानासाठी जलयुक्त शिवार अभियान पहिला टप्पा, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्प व आदर्श गाव तसेच इतर पाणलोट क्षेत्र विकासाची कामे पूर्ण झालेली गावे वगळता उर्वरित गावे निवडण्यात येतील. गाव आराखडा तयार करताना पाणलोट क्षेत्र हा नियोजनाचा घटक राहील. अंतिम आराखड्याला ग्रामसभेची मान्यता झाल्यानंतर तांत्रिक आणि प्रशासकीय मान्यता देण्यात येईल. गाव आराखड्यानुसार कामे झाल्यानंतर गावाचा जल परिपूर्णता अहवाल तयार करण्यात येईल.

पूर्ण झालेल्या योजनांसाठी देखभाल दुरुस्ती परिरक्षण देखील करण्यात येईल. गावांमधील ग्रामस्थांची जलसाक्षरता अभियानाद्धारे जनजागृती देखील करण्यात येईल. पिकाच्या उत्पादकेतेमध्ये शाश्वतता आणणे त्याचप्रमाणे सामुहिक सिंचन सुविधा निर्माण करणे या व इतर बाबींचा आराखड्यामध्ये समावेश असेल.

जलयुक्त शिवार अभियानाच्या संनियंत्रणासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली तसेच तालुका स्तरावर उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समित्या असतील. कामे गुणवत्तापूर्ण होण्यासाठी ३ लाखांपेक्षा अधिकचे काम ई-निविदेमार्फत करण्यात येईल. सर्व मृद व जलसंधारण कामाचे मॅपिंग करून नकाशे अद्ययावत करून जिओ पोर्टलवर टाकण्यात येतील.

दरम्यान, महाविकास आघाडी सरकारच्या काळात जलयुक्त शिवार योजनेला स्थगिती देण्यात आली होती. तसेच, कॅगच्या अहवालात योजनेवर ताशेरे ओढण्यात आले होते. त्यामुळे ही योजना वादात अडकली हेाती. या योजनेवरून फडणवीस यांच्यावरही आरोप झाले होते.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Niket Dalal Death: देशाचे पहिले दिव्यांग आयर्नमॅन निकेत दलालांचे निधन; हॉटेलमधील मुक्काम ठरला अखेरचा!

Latest Marathi News Update live : राज ठाकरे यांची कार्यकर्त्यांना तंबी

Ramayana Teaser : बहुचर्चित 'रामायण'चा टीजर प्रदर्शित, रणबीर कपूर आणि साई पल्लवीच्या लूकने वेधलं लक्ष

Laxman Hake : गिरगाव चौपाटीतील समुद्रात उतरून लक्ष्मण हाकेंचं आंदोलन; तर पोलिसांकडून धरपकड