थोडक्यात
उद्धव ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर
उद्धव ठाकरेंच्या मराठवाडा दौऱ्यावर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया
"उद्धव ठाकरे टोमणे मारण्याच्या पलिकडे काहीच करू शकत नाहीत"
(Devendra Fadnavis ) राज्यात मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे पाहायला मिळाले. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीने राज्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. याच पार्श्वभूमीवर आता उद्धव ठाकरे 5 दिवसीय मराठवाडाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. 5 ते 9 नोव्हेंबरला उद्धव ठाकरे मराठवाडा दौरा करणार असून मराठवाड्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांशी उद्धव ठाकरे संवाद साधणार आहेत.
धाराशीव, सोलापूर, बीड, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, जालना या जिल्ह्यात उद्धव ठाकरेंचा दौरा असणार आहे. शेतकऱ्यांना सरकारकडून मदतनिधी देण्यात येणार होता, तर ही मदत पोचली का? याबाबतही शेतकऱ्यांशी संवाद साधून उद्धव ठाकरे आढावा घेणार असल्याची माहिती मिळत आहे. उद्धव ठाकरे शेतकऱ्यांसोबत भेटी आणि पदाधिकाऱ्यांसोबत बैठकसुद्धा या दौऱ्यात घेणार असल्याची माहिती मिळत आहे.
याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, "चांगलं आहे विरोधी पक्षाचं काम आहे. पहिल्यांदा उद्धवजी बाहेर पडलेत. मला आनंद आहे. उद्धव ठाकरे टोमणे मारण्याच्या पलिकडे काहीच करू शकत नाहीत. विकासावर केलेलं त्यांचं एक भाषण दाखवा आणि हजार रुपये मिळवा." असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
यासोबतच ते म्हणाले की, "निवडणुकांची घोषणा झाली आहे. आम्ही त्या निवडणुकांना सामोरे जाऊ. आमचे तीनही पक्ष आपापल्या परिने त्या स्तरावर युतीच्या संदर्भात निर्णय घेतील. पण कुठल्याही परिस्थितीत आम्ही तिघं एकच आहोत. या नगरपालिकेच्या निवडणुकीत महाराष्ट्राची जनता मोठ्या प्रमाणात आमच्या महायुतीला कौल देईल."
राज ठाकरेंच्या ट्विटवर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, "राज ठाकरेंना एकच उत्तर पाहिजे निवडणुका पुढे ढकला. त्यांना दुसरं कुठलेही उत्तर अपेक्षित नाही. सुप्रीम कोर्टाच्या आदेशामुळे निवडणुका पुढे जाऊ शकत नाही. त्यामुळे त्यांना अपेक्षित उत्तर मिळू शकत नाही." असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.