17 जुलै रोजी विधिमंडळ परिसरात झालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर विधानसभेत आज तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. या वादात सहभागी असलेल्या भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना सभागृहात खेद व्यक्त करण्यास सांगण्यात आलं.
गोपीचंद पडळकर यांनी झालेल्या प्रकाराबद्दल खेद व्यक्त केला. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी त्यांना येणाऱ्या धमक्यांचा उल्लेख केला. त्यांनी सांगितलं की, राड्याच्या दिवशीही त्यांच्या नावाने धमक्या देण्यात आल्या होत्या. त्यांनी त्या धमकीचे तपशील सभागृहात सांगण्याचा प्रयत्न केला असताना सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी त्यांचं भाषण रोखण्याचा प्रयत्न केला.
या गोंधळावर विरोधकांनी आक्षेप घेत "आव्हाडांना बोलू द्या" अशी मागणी केली. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला रोष व्यक्त केला. त्यांनी म्हटलं, “काल जो प्रकार घडला, त्यातून फक्त एका व्यक्तीचं नव्हे, तर संपूर्ण विधिमंडळाचं नुकसान झालं आहे. बाहेर लोक म्हणतायत की सर्व आमदार माजलेत. हे अत्यंत दुर्दैवी आहे.”
फडणवीस पुढे म्हणाले, “आव्हाडांनी धमक्यांचा उल्लेख करणं चुकीचं नाही, पण चर्चेचा मूळ मुद्दा विसरून राजकारण करणं योग्य नाही. सभागृहात अध्यक्षांनी ठराव ठेवलेला असताना त्यावर केंद्रित राहणं गरजेचं आहे. प्रत्येक वादाचा राजकीय वापर होणं थांबायला हवं.” मुख्यमंत्र्यांनी पुढे सांगितलं, “आपण ज्या गोष्टीबाबत बोलतो आहोत ती एखाद्या आमदाराची प्रतिष्ठा नाही, ती सभागृहाची प्रतिष्ठा आहे. लोकांचा विश्वास आपण गमावत चाललोय. यामुळे आपल्याला स्वतःकडे पाहण्याची गरज आहे.”
या वादानंतर दोन्ही पक्षातील आमदार शांत राहण्याच्या सूचना दिल्या गेल्या आणि विधानसभेतील वातावरण काहीसं स्थिर झालं. मात्र, सभागृहातील प्रतिष्ठेवर झालेला आघात आणि लोकांमध्ये निर्माण झालेला रोष यावर चर्चा काही काळ सुरू राहणार, हे स्पष्ट झालं आहे.