बीड जिल्ह्यात अपहरण करून युवकाला मारहाण करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. बीड जिल्ह्यातील बाभळगाव ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच दादा खिंडकरच्या टोळीकडून एका युवकाला बेदम मारहाण केल्याचं या व्हिडीओत दिसत असल्याचं समोर येत आहे. दादा खिंडकरनंच अधिवेशनाच्या आदल्या दिवशी सतोष देशमुखांच्या मारहाणीची एफआयआर आणि चार्जशीटचे फोटो व्हायरल झाले आहेत.
पाईप, काठ्या आणि बेल्टने 7 जणांनी युवकाला मारहाण केल्याचं या व्हिडीओमध्ये दिसून येत आहे. पीडित ओंकारनं सरपंचाच्या गँगविरोधात पोलिसांत तक्रार दिल्यानं त्याला शेतात नेत मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे. दोन महिन्यांपूर्वी हा प्रकार घडला असून पोलिसांनी अद्यापही कारवाई केली नसल्याची माहिती समोर आली आहे.मारहाण करणा-यांमध्ये नाना नावाचा एक पोलीस कर्मचारीही सहभागी असल्याचेही बोलले जात आहे. सरपंच दादा खिंडकरवर अनेक गुन्हे दाखल असल्याचं समोर येत आहे. बीड आणि पिंपळनेर पोलीस स्टेशनमध्ये खिंडकरवर गंभीर गुन्हे दाखल आहेत.
दरम्यान या प्रकरणी आता संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. धनंजय देशमुख म्हणाले की, "या प्रकरणी मारहाण करणारा आणि मारणारा यांच्या प्रतिक्रिया समोर येतील. त्यावेळी याप्रकरणाबद्दल सर्व माहिती समोर येईल. बीडमध्ये पोलिस यंत्रणेने लक्ष ठेवणे गरजेचे आहे. गुन्हेगारी कोण करतं? यापेक्षा गुन्हेगारी कशी रोखता येईल? याकडे लक्ष देणे अधिक गरजेचे आहे".