महाविकास आघाडीमध्ये अभिनेता सुशांत सिंग राजपूतचे प्रकरण प्रचंड गाजले होते. या प्रकरणासोबतच सुशांतच्या माजी मॅनेजर दिशा सालियन हिच्या मृत्यू प्रकरणाची देखील चर्चा होत होती. मात्र, आता शिंदे- फडणवीस सरकार आल्यानंतर हे प्रकरण पुन्हा बाहेर आले आहे. दरम्यान, या प्रकरणात सत्ताधारी गट आदित्य ठाकरेंवर हिवाळी अधिवेशनादरम्यान आक्रमक झाले होते. त्यावरच आता सीबीआयकडून महत्त्वाचं स्पष्टीकरण देण्यात आल आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्या अडचणींमध्ये वाढ होऊ शकते.
दिशा सालियन प्रकरण सीबीआयने कधीही हाताळेलं नाही. या प्रकरणावर सीबीआयने कधीच चौकशी केलेली नाही, असं स्पष्टीकरण सीबीआयकडून देण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. दिशा सालियन प्रकरणी सीबीआयने तपास करुन तिने आत्महत्या केल्याने मृत्यू झाल्याचं सांगितल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. पण सीबीआयकडून या प्रकरणावर कोणताही तपास झाला नसून तसा काहीच निष्कर्ष काढण्यात आलेला नाही, असे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे.
दिशा सालियन मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरे यांचं लोकेशन ट्रेस करा, त्यांची नार्को टेस्ट करा अशी मागणी सत्ताधाऱ्यांकडून होत आहे. राणे कुटुंबीयांनी तर या प्रकरणात थेट आदित्य ठाकरे यांचा सहभाग असल्याचा आरोप केला जात होता. परंतु, ठाकरे कुटुंबीयांकडून मात्र या प्रकरणी संयमाची भूमिका घेतली जातेय. गेल्या काही दिवसांसून हे आरोप-प्रत्यारोप होत असतानाच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वी एसआयटी चौकशी करणार असल्याची घोषणा केली होती. त्या पूर्वीच दोन दिवसांपूर्वी शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी रिया चक्रवर्तीच्या फोनवर एयू नावाने फोन येत होते आणि एयू म्हणजे आदित्य ठाकरे असा असल्याचा आरोप केला होता. त्यामुळे हे प्रकरण प्रचंड तापलेले आहे.