राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि राष्ट्रावादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची काल भेट झाल्याच्या बातम्या प्रकाशित झाल्या होत्या. त्यानंतर राज्यात अनेक चर्चांना उधाण आले होते. मात्र, आता या बातमीवर राज्याचे मुख्यमंत्री एकानाथ शिंदे यांनी ट्वीट करत खुलासा केला आहे.
एकनाथ शिंदे यांनी याबाबत खुलासा करताना म्हटलं आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री.शरद पवार साहेब यांच्या सोबतचा एक फोटो सध्या व्हायरल केला जात आहे. अशाप्रकारची कोणतीही भेट झालेली नाही. कृपया अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन त्यांनी केले आहे.
विधानपरिषदेच्या निकालानंतर एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक आमदारांनी बंडखोरी केली होती. त्यानंतर व्हाया सुरत, गुवाहाटी, गोवा असा प्रवास करून शिंदे गट महाराष्ट्रात दाखल झाले. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी ११ नोव्हेंबर २०२१ ला शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर राष्ट्रवादीच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून या भेटीची माहिती देण्यात आली होती. या भेटीचा फोटो आता व्हायरल केला जात असून एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर पवार यांची भेट घेतल्याचं सांगितलं जात आहे.