Uddhav Thackeray Team Lokshahi
राजकारण

उद्धव ठाकरेंना धक्क्यांवर धक्के : ठाण्यातील 66 नगरसेवकांनी सोडली साथ, 12 खासदारही जाणार?

ठाण्यात शिवसेनेला आणखी मोठा झटका बसला आहे. ठाणे महानगरपालिकेतील 67 पैकी 66 विद्यमान नगरसेवकांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली आहे.

Published by : Team Lokshahi

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे तब्बल 40 आमदार फोडून उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का दिला होता. त्यानंतर आता ठाण्यात शिवसेनेला आणखी मोठा झटका बसला आहे. ठाणे महानगरपालिकेतील 67 पैकी 66 विद्यमान नगरसेवकांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली आहे. कालच माजी खासदार आनंदराव आडसूळ यांनी शिवसेनेच्या नेतेपदाचा राजीनामा दिला होता. तसेच १२ खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचा दावा शिवसेना आमदार गुलाबराव पाटील यांनी केला.

ठाण्यातील माजी महापौर नरेश मस्के यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. या नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला. या सगळ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ठाणे शहरातून उद्धव ठाकरेंची शिवसेनेचे अस्तित्त्व पूर्णपणे पुसले जाण्याची शक्यता आहे.

शिवसेनेसाठी एकनाथ शिंदे हेच ठाणे जिल्ह्यातील कारभार एकहाती सांभाळत होते. त्यामुळे ठाण्यात एकनाथ शिंदे यांचे वर्चस्व आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरुद्ध बंड पुकारल्यापासूनच ठाण्यातील शिवसेनेतील एक मोठा गट फुटेल, अशी चर्चा होती. ही शक्यता अखेर खरी ठरली आहे. आता तब्बल ६६ नगरसेवक एकनाथ शिंदे गटात गेले. यामुळे आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेना काय करणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

अशी आहे पक्षीय बलाबल

शिवसेनेचे ६७

राष्ट्रवादी काँग्रेस ३४

भाजप २३

काँग्रेस ३

एमआयएमक २

भाजपचे २३ आणि शिवसेना शिंदे गटाचे ६६ नगरसेवक मिळून ८९ नगरसेवक होतात. मनपातील १३१ नगरसेवकांपैकी तब्बल ८९ नगरसेवक शिंदे-भाजप गटाचे होतात.

१२ खासदार जाणार

बंडखोर आमदारांच्या सत्ता नाट्यानंतरही शिवसेनेतील बंडखोरी थांबणार नाही. शिवसेनेचे २२ माजी आमदार आणि १२ खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचा दावा शिवसेना आमदार गुलाबराव पाटील यांनी केला. जळगाव जिल्ह्याचे माजी पालकमंत्री असलेले गुलाबराव १५ दिवसांनंतर घरी पाळधी येथे आले. या वेळी ते म्हणाले, “शिवसेनेतील बरेच आमदार नाराज असल्याची कल्पना मी उद्धव ठाकरे यांना दिली होती..’

...त्या ४० मतदारसंघांत भाजपचे उमेदवार नाही

राज्यात शिवसेनेच्या ४० आमदारांचा गट एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहे. या गटातील ज्या मतदारसंघात शिवसेनेचे आमदार आहेत त्या मतदारसंघात भाजप उमेदवार नसतील. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तसे आश्वासन मिळालेले आहे. दहा अपक्ष आमदारांसोबत बंडखोरी केलेल्या ५० आमदारांना निवडून आणण्याची ग्वाही एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहे, अशी माहिती आमदार किशोर पाटील यांनी पाचोऱ्यात दिली.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा