(Laxman Hake ) आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 26वा वर्धापन दिन आहे. यातच आता लक्ष्मण हाके यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे. लक्ष्मण हाके पोस्टमध्ये म्हणाले की, 'राष्ट्रवादीचा वर्धापन दिन ओबीसी,भटक्या- विमुक्तांसाठी काळा दिवस! २० मे १९९९ ला शरद पवारांनी काँग्रेस सोडली. पुढची दिशा धुसर होती. बंडखोर पवारांसोबत यायला कुणीही तयार नव्हतं. सर्वांना आपआपल्या राजकारणाचं पडलं होतं. अशात दिल्लीतून परतलेल्या शरद पवारांच्या गळ्यात स्वागताचा पहिला हार घातला तो ’स्वर्गीय शिवाजी बापू शेंडगे’ यांनी. संकटात उपयोगी पडतो तो खरा मित्र. पण पवारांनी संकटात साथ देणाऱ्या या मित्राची परतफेड शेंडगे घराण्याचं राजकारण संपवून केली. छगनरावजी भुजबळ असोत की प्रा लक्ष्मणराव ढोबळे की उपरा कार लक्ष्मण माने हे नेहमी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात हेलकावे खात राहिले, धक्के बुक्के खात राहिले, नाव राष्ट्रवादी आणि काम जातीवादी. तेव्हापासून या पक्षाविरोधात धनगर, भटकेविमुक्त, ओबीसींच्या मनात प्रचंड चीड आणि तिरस्कार आहे. धनगर समाजाच्या अस्तित्त्वाला सुरुंग लावण्याचं काम राष्ट्रवादीने आजही करते आहे. एकीकडे राष्ट्रवादी २६ वा वर्धापन दिन साजरा करेल. दुसरीकडे रायगडावरील धनगरांच्या घरांवर ‘बुलडोझर’ फिरवण्याची तयारी सुरु आहे. विशेष म्हणजे पालकमंत्री तथा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी हे आदेश दिलेत. याच राष्ट्रवादीने पोसलेली संघटना संभाजी ब्रिगेड. संभाजी ब्रिगेडने वाघ्याचा पुतळा हटवण्याची मागणी करते. 31 मेला अहिल्यादेवींची 300 वी जयंती साजरी झाली. त्याच दिवसाचा अल्टिमेटम दिला. उत्साहाला गालबोट लावण्याचे प्रयत्न होते. ते समस्त ओबीसी समाजाने एकत्र येत उलथवून लावले. या सगळ्या घटना पाहिल्यास प्रश्न पडतो.'
'राष्ट्रवादीला धनगर समाजाचं एवढं पित्त का आहे? राष्ट्रवादीला नेमकी कोणती विचारधारा आहे? फुले, शाहु, आंबेडकरांचं नावसुद्धा शाहु, फुले, आंबेडकर या क्रमात ते घेतात. समाजपरिवर्तनाच्या क्रमाला जातकेंद्री नजरेतून पाहतात. आज आम्ही महात्मा फुलेंच्या नावाने स्थापन झालेल्या महाज्योती संस्थेच्या निधीसाठी भांडतोय. महाज्योतीच्या निधीत कपात करण्याचं काम अजित पवारांनी केलं. फुलेंचा विचार पुढे नेणाऱ्या संस्थेला दुबळं केलं जातंय. त्यामुळे फुले, शाहु, आंबेडकरी चळवळीशी त्यांचा काही संबंध आहे. हे मानायला महाराष्ट्र तयार नाही. सामाजिक न्यायाच्या प्रयत्नांना खुजं करुन स्वतःच्या इमेज बिल्डिंगसाठी 200- 200 कोटी खर्चणारा हा पक्ष आहे. यशवंतराव चव्हाणांचा सुसंकृत महाराष्ट्र असा उल्लेख वारंवार केला जातो. चव्हणांनी अनेकदा कबुल केलंय की, ‘त्यांच्या सामाजिक आणि राजकीय जडणघडणीवर नेहरुंचा प्रभाव आहे.’ हे तेच नेहरु आहेत ज्यांनी आरक्षणार्थींकडे कायम तुच्छतेने पाहिले. सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षणण दिल्यास कार्यक्षमता ढासळेल असा नेहरुंचा समज होता. ज्या राज्यात जो समाज जास्त त्यांना मुख्यमंत्रीपदं वाटली. उपेक्षितांचा विकासमार्ग रोखला. ओबीसी आरक्षणासाठी लढणाऱ्या बाबासाहेबांना राजीनामा द्यायला लावला. बाबासाहेबांचा राजकीय पराभव केला. नेहरु- चव्हाण- पवार ही विचार साखळी ओबीसींसाठी साखळदंड बनली आहे. यशवंतराव चव्हाणांच्या विचारांवर राष्ट्रवादी कॉंग्रेस चालते. फक्त दिड वर्ष यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यांच्यानंतर सलग ११ वर्षे वसंतराव नाईक मुख्यमंत्री राहिले. नाईकांनी रोजगार हमी योजना आणली, भुदान चळवळीला वेग दिला, भटक्या समुहांना आरक्षण दिलं. महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने ‘मराठी’चं राज्य बनवलं वसंतराव नाईकांनी. त्यांचा साधा नामोल्लेखही केला जात नाही. हा महाराष्ट्रा जर कुणाचा असेल तर तो सर्वसमावेशक विकासाचा मंत्र देणाऱ्या वसंतराव नाईकांचाही महाराष्ट्र आहे.'
यासोबतच त्यांनी पुढे म्हटले आहे की, 'मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं एक आठवतं. ते म्हणाले होते, “राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून महाराष्ट्रात जातीचं राजकारण सुरु झालं.” एखाद्या लाठीचार्ज झाला. तिथं पवारांचे नातू आणि माजी आमदार रात्रीच्या अंधारात पोहचतात. फडणवीस आणि ओबीसीविरोधीची पट्टी एका आंदोलकाला पढवतात. यानंतर महाराष्ट्राची सामाजिक वीण कायमची उसवली जाते. ओबीसी नेत्यांची घरं, हॉटेल्स टार्गेट केली जातात. जाळपोळ होते. दोन समाज एकमेकांपासून तुटतात. याचा लाभ लोकसभा निवडणूकांमध्ये पवारांना मिळतो. विधानसभा निवडणूकीत ओबीसी जागृत होवून पवारांना चेमकेट देतात. राष्ट्रवादीचं राजकारण समजून घेताना काही प्रश्नांचा विचार आपण केला पाहिजे. महाराष्ट्रातल्या दलित चळवळी कुणी फोडल्या? स्व बी के कोकरे हा लढवय्या कुठनीतिद्वारे कसा संपवला? कामगार चळवळी कशा संपवल्या? शेतकरी संघटनेचे तुकडे कुणी केले? ऊसतोड मजुरांचे शोषण कुणी केले? या प्रश्नाची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करा. वास्तव तुमच्यासमोर उभं राहिल. त्यामुळे ‘फोडा आणि राज्य करा’ या रणनितीला आता बळी पडायचं नाही. माधवने पुढाकार घ्यायचा. बलुतेदार, अलुतेदार, मायक्रो ओबीसी, भटके- विमुक्त, दलित, आदिवासींची खमकी मुठ बांधायची. सर्वांच्या विकासाचा बॅकलॉग भरुन काढण्यासाठी एकीची वज्रमुठ घट्ट करायची. बाबासाहेबांच्या स्वप्नातली सामाजिक लोकशाही अस्तित्वात आणायची.' असे लक्ष्मण हाके यांनी म्हटले आहे.