अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज तिसरा दिवस पार पडला. आजच्या दिवशी सभागृहात अनेक वाद-विवाद होतानाही बघायला मिळाले. भाजपचे राम कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप केल्यामुळे भास्कर जाधव भडकले. या सगळ्यामुळे राम कदम आणि भास्कर जाधव यांच्यामध्ये खडाजंगी झालेलीदेखील बघायला मिळाली. अधिवेशनादरम्यान राम कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर अनेक आरोप केले. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना वैद्यकीय सहाय्यक कक्ष बंद पडल्याचा आरोप केला होता. त्यावरून भास्कर जाधवांनी राम कदम यांना उत्तर दिले आहे.
राम कदमांच्या आरोपांवर उत्तर देताना राम कदम म्हणाले की, "राम कदम हे वारंवार उद्धव ठाकरेंचे नाव घेतात आणि त्यांच्यावर आरोप करतात. ज्या प्रतिष्ठित व्यक्तीला आपल्यावर होत असलेल्या आरोपांवर खुलासा करता येत नाही त्यांचा नामोल्लेख करु नये. विरोधी पक्ष संख्येने कमी आहे. पण लोकशाहीचे संवर्धन करायचं असेल तर विरोधी पक्षांना बोलण्याची संधी मिळावी ". यावेळी भास्कर जाधव आणि राम कदम यांच्यामधील वाद वाढले असल्याचे दिसून आले.