सध्या विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन गाजत आहे. आज अधिवेशनाचा तिसरा दिवस असून शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्यामध्ये शाब्दिक युद्ध झालेले बघायला मिळाले. खात्याबद्दल पाटील यांना कळलं आहे का? असा टोला आदित्य ठाकरे यांनी पाटलांना लगावला. त्यावर उत्तर देताना पाटलांनी आदित्य ठाकरे यांचा बापच काढल्याचे दिसून आले. मात्र या सर्व प्रकारानंतर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दोघांनाही थांबवले.
अधिवेशनादरम्यान आमदार रोहित पवारांनी पाणी पुरवठा विभागाबद्दल प्रश्न विचारले. त्यावेळी गुलाबराव पाटील यांना व्यवस्थित उत्तर देता आलं नाही. यावेळी आदित्य ठाकरे यांनी "पाटलांना खातं कळतं का?" असा टोला लगावला. त्यावर लगेचच पाटलांनी आदित्य ठाकरेंचा बाप काढला आणि त्यावर लगेचच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी वैयक्तिक टिप्पणी टाळण्याचा सल्ला दिला.
अधिवेशनामध्ये नक्की काय झालं?
अधिवेशनादरम्यान मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, अध्यक्ष महोदय, केंद्र सरकारचा आणि राज्य सरकारच्या आकड्यामध्ये असणाऱ्या तफावतीबद्दल सांगितले. केंद्र सरकार आणि राज्य सरकारची तपासणी करण्याची पद्धत वेगळी आहे. त्यामुळे दोन्ही आकडे वेगळे आले आहेत. राज्य सरकारची तपासणीची पद्धत वेगळी आहे. त्यामुळे तुम्ही आधी ऐका. शांत बसा".
त्यानंतर आदित्य ठाकरे म्हणाले की, "हे विधीमंडळ आहे. कायदेमंडळ आहे. विरोधी पक्ष असला तरीही सत्ताधारी पक्षाला सहकार्य करु. इथे अनेक मंत्री अभ्यास करून येतात. स्वतः मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री स्वतः उत्तर देत आहेत. अध्यक्ष महोदय, माझी आपल्याला विनंती राहील की आपण या विषयाबद्दल आपल्या दालनात एक बैठक बोलवावी. आपलं राज्य कृषिप्रधान आहे. औद्योगिक प्रगती झालेलं राज्य आहे. आपण एकमेकांकडे बोटं दाखवून चालणार नाही. हे आता म्हणतात बैठका लावायला पाहिजे. मग यांना खातं कळलंय की नाही? सत्ताधारी पक्षाचेपण अनेक प्रश्न आहेत आणि ते मंत्री सत्ताधारी आमदारांनादेखील उत्तरं देऊ शकत नाहीत. त्यामुळे त्या प्रश्नाचं उत्तर राखीव ठेवा. मंत्र्यांना सांगा अभ्यास करुन उत्तर द्या".
त्यावर गुलाबराव पाटील म्हणाले की, "त्यांच्या बापाला मी कळलो म्हणून त्यांनी मला ते खातं दिलं. यांना याबद्दल माहिती नाही". दरम्यान यावर नार्वेकरांनी वैयक्तिक आयुष्यावर टिप्पणी न करण्याचा सल्ला दिला.