राज्यात सध्या प्रचंड राजकीय गोंधळ सुरु आहे. त्यातच आता एका महिन्याच्या आतच पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा मुंबई दौऱ्यावर आले आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे दौरे होत असल्याची चर्चा राजकीय होत. आजच्या या दौऱ्यात मोदींनी विविध विकास कामांचं उद्घाटन केलं आहे. यावेळी त्यांनी ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ रेल्वेला हिरवा झेंडाही दाखवला आहे. या कार्यक्रमप्रसंगी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले. सोबतच अर्थसंकल्पात महाराष्ट्राला व मुंबईला भरभरून निधी दिल्याबद्दल आणि या विकसाकामांच्या लोकार्पणाला उपस्थित राहिल्याबद्दल आभार मानले.
कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, राज्यात आमचे हे सहा-सात महिन्यांचे सरकार केवळ तुमच्या आशीर्वादाने बनले. तुमच्यामुळे सामान्य माणसांच्या मनातले सरकार सत्तेवर आले. याच सरकारने हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे तुमच्या हस्ते उद्घाटन करून घेतले. आता लाखो लोक या ट्रेनचा लाभ घेत आहेत. तसेच मुंबईतल्या मेट्रोचे उद्घाटन झाले. इतरही महत्त्वाचे प्रकल्प राज्यात सुरू झाले आहेत. आगामी काळात आणखी काही प्रकल्प राज्यात तुमची वाट पाहात आहेत. आम्ही तुम्हाला त्याचं उद्घाटन करण्यासाठी बोलवू. तुम्ही असंच आमचं सहकार्य करत राहा. असे मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले.