Balasaheb thackeray and Uddhav Thackeray  
राजकारण

शिवसेनेतील आतापर्यंतचे बंड अन् बंडखोर नेत्यांचे काय झाले?

आतापर्यंत शिवसेनेत झालेल्या बंडाच्या वेळी बाळासाहेब ठाकरे होते. आता उद्धव ठाकरे आहेत. ते हे बंड कसे शांत करतात आणि शिवसेना मजबूत करतात, हे येणाऱ्या काळातच दिसणार आहे.

Published by : Jitendra Zavar

44 वर्षांपुर्वी 19 जून रोजी बाळासाहेबांनी शिवसेनेच्या स्थापना केली. त्यानंतर 44 वर्षांनी 21 जून रोजी शिवसेनेत आणखी एक बंड झाले. शिवसेनेत आतापर्यंत झालेले बंड हे महत्त्वाकांक्षेतून झालेले नेत्यांचे बंड होते. आता काँग्रेस-राष्ट्रवादीसोबतच्या आघाडीवरून पक्षाच्या धोरणाविरोधात सामूहिक बंड केले आहे. हा पूर्वीच्या आणि आताच्या बंडातील मुख्य फरक आहे. शिवसेनेत राज ठाकरेंच्या रुपाने घरातील बंडही झाले होते. तसेच छगन भुजबळ, गणेश नाईक, नारायण राणे यांच्या बंडखोरीतूनही शिवसेना बाहेर पडली. आतापर्यंत शिवसेनेत झालेल्या बंडाच्या वेळी बाळासाहेब ठाकरे होते. आता उद्धव ठाकरे आहेत. ते हे बंड कसे शांत करतात आणि शिवसेना मजबूत करतात, हे येणाऱ्या काळातच दिसणार आहे.

बंडू शिंगरेंची प्रती शिवसेना

शिवसेनेत बंडखोरीची परंपरा नवीन नाही. शिवसेना स्थापन झाल्यानंतर 1970 च्या दशकात बंडू शिंगरे यांनी प्रती शिवसेना स्थापन करून पाहिलं बंड केलं होतं. परंतु बाळासाहेब ठाकरे यांच्या झंझावातापुढे प्रती शिवसेना उभी राहू शकली नाही.

1991 मध्‍ये भुजबळांनी दिला हादरा

शिवसेनीतील चर्चेतील पहिले बंड होते ते छगन भुजबळ यांचे. मनोहर जोशी यांना विरोधी पक्षनेते केल्याच्या रागातून 1991 मध्ये भुजबळ यांनी बंड केले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत भुजबळ यांच्यांसोबत 18 आमदार होते. आपला वेगळा गट त्यांनी विधानसभेत तयार केला. सेनेतून बाहेर पडल्यानंतर कडव्या शिवसैनिकांनी भुजबळांवर हल्लेही केले. शिवसैनिकांनी भुजबळांच्या सरकारी A10 या बंगल्यावर हल्ला केला होता. त्याचं नेतृत्व विलास अवचट यांनी केलं होत. पुढं ते एका महामंडळाचे अध्यक्ष झाले होते. भुजबळ मंत्री असताना मिलिंद वैद्य यांनी लखोबाच्या घोषणा देत दगडफेक केली. तेच वैद्य पुढे मुंबईचे महापौर झाले.

गणेश नाईकांचे फसलेले बंड

राज्यात शिवसेना-भाजपची सत्ता असताना नवी मुंबईत गणेश नाईक यांचे वर्चस्व अनेकांच्या डोळ्यांत खुपू लागले. त्यातून पुढे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व गणेश नाईक यांच्यात खटका उडाला. त्यातून अखेर गणेश नाईक यांनी शिवसेनाला जय महाराष्ट्र केला. पण पुढे १९९९ च्या विधानसभा निवडणुकीत गणेश नाईक यांचा पराभव झाला. हे बंडही एका नेत्याचे बंड राहिले.

नारायण राणेंनी सोडली शिवसेना

शिवसेनेतील मोठे बंड केलं ते नारायण राणे यांनी. 2005 साली उद्धव ठाकरे यांच्यामुळे आपण सेनेतून बाहेर पडत आहोत, असा आरोप करत ते बाहेर पडले. त्यांच्या सोबत 11 आमदार होते. त्यावेळीही शिवसेनेत उभी फूट टाळण्यात शिवसेना नेतृत्वाला यश आले. राणे समर्थक आणि शिवसैनिक यांच्यात कोकणात अजूनही राडा सुरू होता.

राज ठाकरेंचे घरातील बंड

नारायण राणेंच्‍या बंडानंतर सेनेला सर्वात मोठा फटका बसला तो राज ठाकरे यांच्या बंडाचा. राज ठाकरेंमुळे प्रथमच ठाकरे घराण्यात फूट पडली. महाबळेश्वर येथे झालेल्या शिवसेनेच्या शिबिरात राज ठाकरे यांनीच उद्धव ठाकरे यांच्या नावाची घोषणा केली होती. त्यानंतर त्यांनी ‘माझ्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरले आहे, असा आरोप करत शिवसेनेला जय महाराष्ट्र केला. या बंडाखोरी दरम्यान बाळा नांदगावकर आणि इतर एखाद्या आमदाराचा पाठिंबा राज यांना मिळाला. पण मनसे स्थापन झाल्यावरही शिवसेनाच वरचढ राहिली.

आता एकनाथ शिंदे

आनंद दिघे यांचं तालमीत तयार झालेले एकनाथ शिंदे यांनी यावेळी बंड केले. हे बंड पूर्वीच्या बंडांपेक्षा वेगळे आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीसह महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यास त्यांचा विरोध आहे. तसेच आपल्याशी योग्य संवाद-संपर्क ठेवला जात नाही, हा त्यांचा आरोप आहे. त्यामुळेच भुजबळ, राणे, नाईक, राज ठाकरे यांच्याप्रमाणे हे केवळ वैयक्तिक महत्त्वाकांक्षेतून झालेले बंड नसून शिवसेनेच्या आमदारांच्या नाराजीचा सामूहिक स्फोट आहे.

शिवसेनेतील आतापर्यंतचे बंड बाळासाहेब ठाकरे यांच्या करिष्म्याच्या जोरावर निस्तारली गेली. बाळासाहेब शिवसैनिकांचे दैवत होते. त्यामुळे ही बंड शिवसेने पचवली आणि शिवसेनेची ताकद कायम राहिली. आता एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाचीही कसोटी लागणार आहे. कारण राज्यसभा त्यापाठोपाठ विधान परिषद निवडणुकीतील अपयश शिवसेना पचवू शकेल. परंतु आगामी मुंबई मनपा निवडणुकीत शिवसेनेचा करिष्मा कायम ठेवावा लागणार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Asia Cup : भारत सरकारची पाकिस्तानच्या हॉकी संघाला आशिया चषकासाठी परवानगी

Pune Crime : पुण्यातील अत्याचार प्रकरणात मोठा खुलासा; Delivery Boy आरोपी हा निघाला तरुणीचा मित्र

Sushil Kedia Post For Raj Thackeray : 'मी मराठी शिकणार नाही...' सुशील केडिया यांनी राज ठाकरे यांना पोस्ट करत डिवचलं

Ashadhi Wari 2025 : आषाढी एकादशीचा उपवास कधी सोडावा जाणून घ्या...