राजकारण

माझ्यासारख्यांचे अस्तित्वच मिटवून टाकण्याच्या...; मेधा कुलकर्णींची भाजपवर उघड नाराजी

पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदारसंघ चंद्रकांत पाटील यांच्यासाठी मेधा कुलकर्णी यांना सोडावा लागला होता. त्यानंतर त्यांना अनेक संधीसाठी भाजपकडून डावलण्यात आले. यावर त्यांनी आज जाहिर नाराजी व्यक्त केली आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

अमोल धर्माधिकारी | पुणे : पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदारसंघ पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासाठी माजी आमदार आणि भाजप नेत्या मेधा कुलकर्णी यांना सोडावा लागला होता. त्यानंतर त्यांना अनेक संधीसाठी भाजपकडून डावलण्यात आले. त्यांनी याबाबत वेळोवेळी आपली नाराजी उघडपणे नाही तर, अप्रत्यक्षपणे व्यक्त केली आहे. त्यातच उद्या चांदणी चौकातील उड्डाणपुलाचे लोकार्पण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मेधा कुलकर्णी यांनी फेसबुक पोस्ट लिहीत मनातील भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. मेधा कुलकर्णी यांनी या पोस्टमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना टॅग केले आहे.

काय मेधा कुलकर्णी यांची फेसबुक पोस्ट?

असे निष्ठावंतांचे डावललेले जिणे.... माझ्यावरील कुरघोडया, डावलणे याबद्दल मी कधी जाहीर वाच्यता केली नव्हती. विश्वासात न घेता अचानक निर्णय घेतले तेव्हाही. पण आता दुःख मावत नाही मनात. वाटले बोलावे तुमच्याशी. चांदणी चौक उद्घाटन कार्यक्रमाची कोथरूडमधील पत्रके पहिली आणि खूप वाईट वाटले. चांदणी चौक या विषयाचे सर्वस्वी श्रेय नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांना आहे. पण, मुळातच त्यांच्याकडे हा विषय नेला कोणी?

स्वतः गडकरी यांनी काही वर्षांपूर्वी एका कार्यक्रमात जाहीर भाषणात म्हणाले की, तत्कालीन आमदार मेधा कुलकर्णी ताईंच्या सांगण्यावरून मी हा मुद्दा घेतला. अनेक असे संदर्भ देता येतील की ज्यात 'कोथरूडचे आधुनिक कुठलेच नेते' या विषयी सहभागी नव्हते, तेव्हापासून सतत पाठपुरावा केला होता. आता मात्र सर्व श्रेय एकट्याचेच असल्यासारखे वागणारे कोथरूडचे सद्य नेते. माझ्यासारख्यांचे अस्तित्वच मिटवून टाकण्याच्या प्रयत्नात आहेत का, असा प्रश्न विचारला आहे.

मध्यंतरी मोदी, अमित शाह पुण्यात येऊन गेले. ठराविक लोकांना प्रोटोकॉल सोडून 'सर्व ठिकाणी'चे पास होते. मी राष्ट्रीय पदावर असून विनंती करूनही मला दिला नाही. साधे कोथरूडच्या मंडल अध्यक्ष पदाच्या प्रक्रियेतही समाविष्ट श्रेणीमध्ये मी अपेक्षित नसेन तर याचा अर्थ स्थानिकांना मी नको आहे. गेली अनेक वर्षे मी हे सहन करीत आहे. त्या त्या वेळी गोष्टी वरीष्ठांपुढे मांडल्या आहेत. देशापुढील आव्हाने, त्यासाठी करायचे अपेक्षित संघटन सोडून, तसेच मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी एकदिलाने कार्य करायचे सोडून, हे स्वतःच्या स्वार्थासाठी विघटनाचे, काटाकाटीचे राजकारण करत आहेत. माझ्या सारख्या निष्ठावान कार्यकर्तीला जाणीव झाली की माझी काही किंमत नाही आहे, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

माझ्याबाबत त्यांना असे करणे सोपे जाते. माझ्याकडे ना मसल पॉवर, ना मनी पॉवर. मी एका सामान्य कुटुंबातून आलेली, विचारधारा घेऊन निष्ठेने काम करणारी कार्यकर्ती आहे. एका वैचारिकतेतून राजकारणात प्रवेश केला. आणि अगदी मनापासून सर्व समाजातील लोकांची कामे केली. आजही जे सोपवले आहे ते करीतच आहे. त्यावर असा बोळा फिरवला जातो आहे हे आता मात्र असह्य होऊन गेले आहे, असेही मेधा कुलकर्णी यांनी म्हंटले आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा