कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांनी उच्च न्यायालयात धाव घेतलीय. ईडीने दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याबाबतची याचिका आमदार मुश्रीफ यांनी दाखल केली आहे.आमदार मुश्रीफ यांच्यावर ईडीकडून फसवणुकीच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हसन मुश्रीफांच्या विविध ठिकाणांच्या मालमत्तांवर ईडीकडून छापेमारी करण्यात आली होती.
इतकचं नाही तर निकटवर्तीय माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर यांचे निवासस्थान, सरसेनापती संताजी घोरपडे कारखाना या ठिकाणी 11 जानेवारी रोजी ईडीने छापेमारी केली होती. या तीन ठिकाणांसह मुश्रीफ यांच्या कन्येच्या कोल्हापुरातील सासने मैदान परिसरातील घरावरही छापा टाकण्यात आला.
11 जानेवारी रोजीच ईडीकडून पुण्यातही मुश्रीफ यांच्याशी संबंधित चार ठिकाणी छापे टाकले होते. त्यामध्ये शिवाजीनगर येथील ई-स्क्वेअर समोर पेट्रोल पंपामागे इमारतीमधील कार्यालय, हडपसर आणि कोंढवा भागातील अशोका सोसायटीत मुश्रीफ यांचे नातेवाईक, तसेच साऊथ मेन रोड-कोरेगाव पार्कमध्ये राहणारे व्यावसायिक भागीदार यांच्यावर छाप्याची कारवाई केली होती.
तसेच या छापेमारीनंतर 1 फेब्रुवारी रोजी आमदार हसन मुश्रीफ अध्यक्ष असलेल्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मुख्य कार्यालय, कागल तालुक्यातील सेनापती कापशी येथील जिल्हा बँकेची शाखा, तसेच गडहिंग्लज तालुक्यातील हरळीमधील 'गोडसाखर'ला लागून असलेल्या जिल्हा बँकेच्या शाखेवरही छापेमारी केली होती.
यावेळी तब्बल 30 तास छापेमारी केल्यानंतर बँकेच्या पाच अधिकाऱ्यांनाही ताब्यात घेत मुंबईला नेऊन चौकशी केली होती. ताब्यात घेतलेल्या अधिकाऱ्यांची 70 तासांनी ईडीने सुटका केली होती. दरम्यान, हसन मुश्रीफ यांनी उच्च न्यायालयात धाव घेत आपल्यावर दाखल केलेले गुन्हे रद्द करण्याची मागणी केली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील एक मातब्बर आमदार म्हणून मुश्रीफ यांची ओळख आहे. काही दिवसांपासून महाविकास आघाडीच्या नेत्यांमागील ससेमिरा सुरुच आहे. आधी अनिल देशमुख, नवाब मलिक आता हसन मुश्रीफही ईडीच्या फेऱ्यात अडकले आहेत.