(Jayant Patil ) आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 26वा वर्धापन दिन आहे. यातच दोन्ही राष्ट्रवादी काका-पुतणे एकत्र येणार का? याची देखील जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून वर्धापन दिन साजरा करण्यात येत असून दोन्ही राष्ट्रवादीकडून वेगवेगळा वर्धापन दिन साजरा करण्यात येणार आहे.
पुण्यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून वर्धापन दिनानिमित्त बालेवाडी इथल्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल या ठिकाणी कार्यक्रम होणार आहे. तर शरद पवार यांचा बालगंधर्व रंगमंदिर येथे कार्यक्रम साजरा करण्यात येत आहे.
याच कार्यक्रमातून जयंत पाटील यांनी शरद पवार यांच्यासमोर एक वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्याने चर्चांना उधाण आले आहे. जयंत पाटील म्हणाले की, "मला पवार साहेबांनी बरीच संधी दिली. सात वर्षाचा कालावधी दिला. शेवटी पक्षाने नव्या चेहऱ्यांना संधी देणं आवश्यक आहे. यानिमित्ताने तुमच्या सर्वांच्या देखत एवढीच साहेबांना विनंती करेन, शेवटी पक्ष पवार साहेबांचा आहे. त्यामुळे पवार साहेबांनी याच्यावर योग्य तो निर्णय घ्यावा. आता आपल्याला बरेच पुढे जायचं आहे. मी पवार साहेबांचे मनपूर्वक आभार मानतो." असे जयंत पाटील म्हणाले.