राजकारण

बारामती अ‍ॅग्रोला मध्यरात्री नोटीस; 72 तासांत बंद करण्याच्या सूचना, रोहित पवार म्हणाले...

रोहित पवार यांना महाराष्ट्र प्रदूषण विभागानं नोटीस धाडली आहे. पुढच्या 72 तासांत बारामती अ‍ॅग्रो प्लांट बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : बारामतीमधील बारामती ॲग्रो या प्लॅन्टवर रात्री दोन वाजता महाराष्ट्र प्रदूषण विभागाने कारवाई केली आहे. रोहित पवार यांना रात्री 2 वाजता नोटीस दिली असून 72 तासांत प्लांट बंद करण्याची सूचना नोटीसीच्या माध्यमातून दिली आहे. रोहित पवार यांनी स्वतः ट्वीट करत यासंदर्भात माहिती दिली आहे.

रोहित पवार म्हणाले की, राज्यातील दोन मोठ्या नेत्यांच्या सांगण्यावरून कुठला तरी द्वेष मनात ठेवून आज पहाटे दोन वाजता राज्य शासनाच्या एका शासकीय विभागाच्या माध्यमातून माझ्या कंपनीच्या एका विभागावर कारवाई करण्यात आली. युवा मित्रांना एकच सांगू इच्छितो की, संघर्ष करतांना भूमिका घेताना अनेक अडचणींचा सामना करावाच लागतो. मी बोलतो, ठोस भूमिका घेतो म्हणून मला अडचणीत आणण्यासाठी आता प्रयत्न सुरू झाले आहेत, परंतु अडचणी आल्या म्हणून संघर्ष थांबवायचा नसतो. भूमिका आणि निष्ठा बदलायची नसते ही मराठी माणसाची खासियत आहे.

हा लढा मी लढणारच आहे, परंतु ज्यांच्या सांगण्यावरून माझ्यावर कारवाई करण्यात येत आहे त्यांना एकच सांगायचंय की, मी आधी व्यवसायात होतो नंतर राजकारणात आलो, परंतु आधी राजकारणात येऊन आणि नंतर व्यवसायात आर्थिकदृष्ट्या बलाढ्य झालेले अनेक जण आहेत. त्यामुळे या नेत्यांना अपेक्षित असलेले काहीही साध्य होणार नाही. तसेच हे द्वेषाचं राजकारण आजच्या पिढीला पटणारंही नाही, असेही त्यांनी म्हंटले आहे.

आपण सत्याच्या बाजूने आहोत आणि केवळ राजकीय सुडापोटी ही कारवाई होत असल्याने माझ्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी आणि कुटुंबाने काळजी करण्याची गरज नाही. माझ्या वाढदिवसानिमित्त 'गिफ्ट' दिल्याबद्दल सरकारचे आभार मानतो, परंतु राज्यातली युवा आणि जनता सरकारला नक्कीच 'रिटर्न गिफ्ट' देईल, ही खात्री आहे. असो! पण सर्वसामान्यांच्या कामाला महिनोन महिने सुस्ती दाखवणारी यंत्रणा या दोन नेत्यांच्या इच्छेसाठी माझ्यावर कारवाई करताना खूप तत्परता दाखवते, याचा मात्र नक्कीच आनंद आहे. या सर्व प्रक्रियेत शासकीय अधिकाऱ्यांना मी कुठलाही दोष देत नाही. न्यायव्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास असून सत्याच्या आधारे न्यायालयात माझा लढा सुरूच राहील, असे रोहित पवार यांनी सांगितले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

NEET-UG 2025 : निकालांविरुद्धची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

Latest Marathi News Update live : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज पुणे दौऱ्यावर

Peanut Kadhi Recipe : आषाढीच्या उपवासाला तयार करा चविष्ट शेंगदाण्याची कढी

गरमागरम डाळ, भात अन् त्यावर तूप घालून खाण्याचे 'हे' फायदे तुम्हाला माहिती आहेत का? जाणून घ्या