राजकारण

Raj Thackeray Jalna : जालन्यातील मराठा आंदोलनकांची राज ठाकरे आज भेट घेणार

जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटीमध्ये मराठा आरक्षणाच्या मागणी करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला.

Published by : Siddhi Naringrekar

जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटीमध्ये मराठा आरक्षणाच्या मागणी करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. या घटनेमुळे राज्यभरातील वातावरण देखील चांगलेच तापले आहे. यावरूनच विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे देखील आज (4 सप्टेंबर) रोजी जालना दौऱ्यावर जाणार असून, आंदोलकांची भेट घेणार आहे.

जालना येथील घटनेवर राज ठाकरे यांनी ट्विट करत आपली प्रतिक्रिया दिली. यावेळी राज ठाकरे म्हणाले की, जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात काल मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून सुरु असलेल्या उपोषणस्थळी पोलिसांकडून लाठीमार झाला आणि गर्दी पांगवण्यासाठी हवेत गोळीबार पण झाला. ही घटना अतिशय दुर्दैवी आहे आणि मी ह्याचा निषेध नोंदवतो. ह्या घटनेवर मी कालपासून लक्ष ठेवून आहे, आणि ह्या घटनेवर येणाऱ्या प्रतिक्रिया पाहत होतो. मुळात मराठा समाजाने आरक्षणासाठी जी आंदोलनं केली, त्या आंदोलनांचा इतिहास बघितला, तर मी माझ्या अनेक सभांमध्ये म्हणलं तसं की, ती आंदोलनं, मोर्चे ह्याचा आदर्श जगाने घ्यावा इतकी शांततेत आणि समंजसपणे झाली होती. अशी पार्श्वभूमी असताना जालन्यात काल काय असं घडणार होतं की प्रशासनाने असं टोकाचं पाऊल उचललं? पोलिसांच्या अहवालात माहिती येईलच, पण मी खात्रीने सांगतो की, पूर्व-इतिहास बघता आंदोलकांनी कोणतंच चुकीचं पाऊल नसतं टाकलं. त्यामुळे इथे सरकारचं चुकलं हे निश्चित. राहता राहिला प्रश्न ह्या संवेदनशील विषयाचा, तर ह्याला आत्ताचे आणि आधीचे सगळेच जबाबदार आहेत. मराठा समाजाला आरक्षण देणं खरंच शक्य आहे का? ते न्यायालयात टिकेल का? बरं आरक्षण देऊन मराठा समाजातील मुलामुलींना देण्यासाठी किती सरकारी नोकऱ्या आहेत? त्या जोडीला ह्या समाजातील तरुण तरुणींना स्पर्धात्मक जगात घौडदौड करण्यासाठी कसं तयार करता येईल ह्यासाठी प्रामाणिक प्रयत्न होत आहेत का? (इथे घोषणा केलेल्या योजनांबद्दल बोलायचं नाहीये तर प्रयत्नांबद्दल बोलायला हवं). मुळात हा प्रश्न फक्त मराठा समाजाच्या आरक्षणापुरता नाहीये, तर एकूणच मराठी तरुण-तरुणींच्या रोजगाराशी संबंधित आहे.

साध्या तलाठी भरतीसाठी जर लाखभर अर्ज येत असतील आणि भरती अवघ्या शेकड्यात होणार असेल, तर मराठी मुलांच्या मनात काय धुमसतंय ह्याचा विचार करावा लागेल. शिकलीसवरलेली मुलं नोकरीच्या शोधात वणवण फिरत आहेत, हे चित्रं चांगलं नाही. त्यामुळे उगाच भूलथापा देणं किंवा एकमेकांवर आरोप करून स्वतःची मान काढून घेणं ह्या दोन्ही गोष्टी आधीच्यांनी आणि आत्ताच्यानी करू नयेत. काल जे घडलं त्यात प्रशासनाची चूकच आहे पण ते ज्या कारणांनी घडलं, त्याला गेल्या २० वर्षांत महाराष्ट्राचं विस्कटलेलं राजकारण, समाजकारण आणि अर्थकारण जबाबदार आहे. ह्यावर दीर्घकालीन उपायांची गरज आहे. चकवा देऊन सरकार बनवणं आणि ते पाडून दुसरं सरकार आणणं, ह्यातून जे काही शौर्य दाखवायची खुमखुमी होती, ती खुमखुमी आता मिटली असेल असं आम्ही मानतो. त्यामुळे आता दोषारोप नकोत तर कृती अपेक्षित आहे. माझी तमाम मराठा समाजातील बांधवांना विनंती आहे की ह्या घटनेचे पडसाद उमटू देऊ नका. तुम्ही आंदोलनं आणि मोर्च्यांचा आदर्श घालून दिला आहेत, तो खरंच वाखाणण्यासारखा आहे. तुमचा राग समजू शकतो पण तुम्ही कोणाच्या राजकारणाला आणि भूलथापांना बळी पडणार नाही ह्याबद्दल मला आणि माझ्या पक्षाला खात्री आहे. मराठी माणसाच्या आक्रोशातून उभ्या राहणाऱ्या कुठल्याही आंदोलनाच्या पाठीशी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आजपर्यंत उभी राहिली आहे आणि ह्यापुढे पण राहील. असे राज ठाकरेंनी ट्विट केलं होते.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Wadala Vitthal Mandir : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विठुरायाच्या चरणी नतमस्तक; प्रति पंढरपुरात पांडुरंगाची केली महापूजा

Latest Marathi News Update live : कोकण किनारपट्टीला आज ऑरेंज अलर्ट, ग्रामीण भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता

Ashadi Ekadashi 2025 : शेतकरी, कष्टकरी, सर्व जनतेच्या सुख-समृद्धी व राज्याच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांची पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना

आजचा सुविचार