राजकारण

जालन्यातील घटना अतिशय दुर्दैवी; राज ठाकरेंचं ट्विट

जालना जिल्ह्यातील अंतरवाली जिल्ह्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी तरुण आंदोलन करत होते.

Published by : Siddhi Naringrekar

जालना जिल्ह्यातील अंतरवाली जिल्ह्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी तरुण आंदोलन करत होते. या मराठा आक्रोश मोर्चाचा उपोषणाचा चौथा दिवस आहे. पोलिसांनी तीव्र लाठीचार्ज केला. यामुळं आंदोलकांनी आक्रमक होऊन पोलिसांवर दगडफेक सुरु केला. यामध्ये काही आंदोलक जखमी झाले आहेत. दरम्यान, या घटनेचे पडसाद राज्यभर उमटताना दिसत आहेत.

याच पार्श्वभूमीवर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विट केलं आहे. राज ठाकरे म्हणाले की, जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात काल मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून सुरु असलेल्या उपोषणस्थळी पोलिसांकडून लाठीमार झाला आणि गर्दी पांगवण्यासाठी हवेत गोळीबार पण झाला. ही घटना अतिशय दुर्दैवी आहे आणि मी ह्याचा निषेध नोंदवतो. ह्या घटनेवर मी कालपासून लक्ष ठेवून आहे, आणि ह्या घटनेवर येणाऱ्या प्रतिक्रिया पाहत होतो. मुळात मराठा समाजाने आरक्षणासाठी जी आंदोलनं केली, त्या आंदोलनांचा इतिहास बघितला, तर मी माझ्या अनेक सभांमध्ये म्हणलं तसं की, ती आंदोलनं, मोर्चे ह्याचा आदर्श जगाने घ्यावा इतकी शांततेत आणि समंजसपणे झाली होती. अशी पार्श्वभूमी असताना जालन्यात काल काय असं घडणार होतं की प्रशासनाने असं टोकाचं पाऊल उचललं? पोलिसांच्या अहवालात माहिती येईलच, पण मी खात्रीने सांगतो की, पूर्व-इतिहास बघता आंदोलकांनी कोणतंच चुकीचं पाऊल नसतं टाकलं.

त्यामुळे इथे सरकारचं चुकलं हे निश्चित. राहता राहिला प्रश्न ह्या संवेदनशील विषयाचा, तर ह्याला आत्ताचे आणि आधीचे सगळेच जबाबदार आहेत. मराठा समाजाला आरक्षण देणं खरंच शक्य आहे का? ते न्यायालयात टिकेल का? बरं आरक्षण देऊन मराठा समाजातील मुलामुलींना देण्यासाठी किती सरकारी नोकऱ्या आहेत? त्या जोडीला ह्या समाजातील तरुण तरुणींना स्पर्धात्मक जगात घौडदौड करण्यासाठी कसं तयार करता येईल ह्यासाठी प्रामाणिक प्रयत्न होत आहेत का? (इथे घोषणा केलेल्या योजनांबद्दल बोलायचं नाहीये तर प्रयत्नांबद्दल बोलायला हवं). मुळात हा प्रश्न फक्त मराठा समाजाच्या आरक्षणापुरता नाहीये, तर एकूणच मराठी तरुण-तरुणींच्या रोजगाराशी संबंधित आहे. साध्या तलाठी भरतीसाठी जर लाखभर अर्ज येत असतील आणि भरती अवघ्या शेकड्यात होणार असेल, तर मराठी मुलांच्या मनात काय धुमसतंय ह्याचा विचार करावा लागेल.

शिकलीसवरलेली मुलं नोकरीच्या शोधात वणवण फिरत आहेत, हे चित्रं चांगलं नाही. त्यामुळे उगाच भूलथापा देणं किंवा एकमेकांवर आरोप करून स्वतःची मान काढून घेणं ह्या दोन्ही गोष्टी आधीच्यांनी आणि आत्ताच्यानी करू नयेत. काल जे घडलं त्यात प्रशासनाची चूकच आहे पण ते ज्या कारणांनी घडलं, त्याला गेल्या २० वर्षांत महाराष्ट्राचं विस्कटलेलं राजकारण, समाजकारण आणि अर्थकारण जबाबदार आहे. ह्यावर दीर्घकालीन उपायांची गरज आहे. चकवा देऊन सरकार बनवणं आणि ते पाडून दुसरं सरकार आणणं, ह्यातून जे काही शौर्य दाखवायची खुमखुमी होती, ती खुमखुमी आता मिटली असेल असं आम्ही मानतो. त्यामुळे आता दोषारोप नकोत तर कृती अपेक्षित आहे. माझी तमाम मराठा समाजातील बांधवांना विनंती आहे की ह्या घटनेचे पडसाद उमटू देऊ नका. तुम्ही आंदोलनं आणि मोर्च्यांचा आदर्श घालून दिला आहेत, तो खरंच वाखाणण्यासारखा आहे. तुमचा राग समजू शकतो पण तुम्ही कोणाच्या राजकारणाला आणि भूलथापांना बळी पडणार नाही ह्याबद्दल मला आणि माझ्या पक्षाला खात्री आहे. मराठी माणसाच्या आक्रोशातून उभ्या राहणाऱ्या कुठल्याही आंदोलनाच्या पाठीशी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आजपर्यंत उभी राहिली आहे आणि ह्यापुढे पण राहील. असे राज ठाकरे म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : मंत्री गिरीश महाजन आझाद मैदानात शिक्षक आंदोलकांच्या भेटीला

IAF Plane Crash : राजस्थानात वायुसेनेचे विमान कोसळले; दोन्ही वैमानिकांनी गमावला जीव

Pakistani Actress Death : भयंकर! दोन आठवड्यांपूर्वी मृत्यू, सडलेल्या अवस्थेतील मृतदेह; पाकिस्तानी अभिनेत्रींच्या गूढ मृत्यूची चौकशी होणार

Pune Crime News : प्रेयसीला रबडीतून दिली गर्भपाताची गोळी, पुण्याच्या हिंजवडीतील धक्कादायक प्रकार