आज रत्नागिरीमध्ये शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षाची सभा झाली. या सभेत अनेक नेत्यांच्या पक्षप्रवेशावरून उद्धव ठाकरेंना शिंदे गटाच्या नेत्यांनी सुनावले आहे. राजन साळवी यांच्या पक्षप्रवेशानंतर तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दिल्लीत झालेल्या सत्कारावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह शरद पवार यांच्यावर देखील टीका केली होती. यावरून आता शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी संजय राऊत यांच्यासह उद्धव ठाकरेंवर देखील टीकांचा वर्षाव केला आहे. लाज वाटली पाहिजे, उद्धव ठाकरे तुम्ही सगळं गमावलं असं म्हणत उद्धव ठाकरेंवर बोलताना रामदास कदम यांनी हल्लाबोल केला आहे. त्याचसोबत राजन साळवींचा पक्ष प्रवेश ही उध्दव ठाकरे यांना राजकीय कानफट असल्याच देखील रामदास कदम म्हणाले आहेत.
राजन साळवी हे उद्धव ठाकरेंसोबत शेवटपर्यंत राहिले पण... -रामदास कदम
रत्नागिरीचे माजी आमदार राजन साळवी यांनी ठाकरे गटाला सोडत शिवसेनेत प्रवेश केला. यावर रामदास कदम म्हणाले की, राजन साळवींचा पक्ष प्रवेश म्हणजे उध्दव ठाकरेंसाठी राजकीय कानफटात आहे. राज्यातील अनेक नेते पक्ष प्रवेशासाठी रांगेत उभे आहेत. अशा अनेक कानफटात त्यांना खायच्या आहेत. उध्दव ठाकरे यांच्या सोबत कोणीही राहणार नाही. त्यांच्यावर शेवटी हम दो हमारे दो अशी परिस्थिती येईल. राजन साळवी हे उद्धव ठाकरेंसोबत शेवटपर्यंत राहिले पण यांच्याकडचे सगळे संपत आहे हे यांच्या लक्षात आले आहे. उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसला हे महाराष्ट्राला कळले आहे. यापूर्वी मी राजन साळवी यांना फोन केला असता तर ते कधीच शिवसेनेत आले असते. राजन साळवी माझ्या भावाप्रमाणे आहे.
संजय राऊत एकाच दगडात दोन पक्षी मारत आहेत- रामदास कदम
पुढे संजय राऊत यांना टोला देताना रामदास कदम म्हणाले की, संजय राऊत एकाच दगडात दोन पक्षी मारत आहेत. एकनाथ शिंदे यांचे कर्तृत्व आहे, म्हणून त्यांना पुरस्कार मिळाला. उध्दव ठाकरेंचे कर्तृत्व काय? शरद पवार हे देशातील मोठे नेते आहेत. आपण कोणावर टीका करत आहोत, याचे भान संजय राऊत यांनी ठेवायला हवे. संजय राऊत हे केवळ प्रसिद्धीसाठी बोलतात. पुढच्या दोन दिवसात संजय राऊत शरद पवारांची जाऊन माफी मागतील, असेही कदम म्हणाले.