अमरावतीच्या खासदार नवनीत राणा व त्यांचे पती विधानसभेचे सदस्य रवी राणा (Ravi Rana and Navaneet Rana)हे दोघेही राज्याचे मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav thackeray)यांचे निवासस्थान असले मातोश्री या ठिकाणी जाऊन हनुमान चालीसा पठण करणार आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी हनुमान जयंतीच्या दिवशी मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा पठण करणार असल्याचे सांगितले होते. यावरती मोठा वादंग निर्माण झाला होता व शिवसैनिकांनी आम्ही त्यांना मातोश्रीवर येऊ देणार नाही यासाठी मातोश्रीबाहेर गर्दी केली होती. आता पुन्हा त्यांनी मातोश्रीवर जाऊन हनुमानचालिसा पठण करत असल्याचे सांगितले आहे.आमदार रवी राणा २३ एप्रिल रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानाबाहेर जाऊन हनुमान चालिसा पठण करणार आहेत. राणांसोबत ५०० हून अधिक कार्यकर्ते असणार आहेत.
याबद्दल बोलताना रवी राणा म्हणाले की, हनुमान जयंतीच्या दिवशी मी उद्धव ठाकरेंना आवाहन केलं होतं की महाराष्ट्रात जेव्हापासून मुख्यमंत्री झालेत तेव्हा सगळ्या महाराष्ट्राला ग्रहण लागलं होतं. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांचं श्रद्धास्थान मातोश्री या निवासस्थानी हनुमान चालिसा पठण करा. पण हनुमान जयंतीच्या शुभ पर्वावर त्यांनी हे पठण केलं नाही. त्यामुळे २२ एप्रिलला आम्ही निघणार आहोत आणि मातोश्रीसमोर हनुमान चालिसा वाचू. ज्याप्रमाणे वारी शांततेत निघते, त्याप्रमाणे आम्ही शांततेत हे पठण करणार आहोत. कोणताही गोंधळ होणार नाही. शांततापूर्वक आम्ही हनुमान चालिसा वाचून महाराष्ट्राच्या शांतीसाठी प्रार्थना करू.
रवी राणा पुढे म्हणाले, मला एक कळत नाही शिवसेना किंवा उद्धव ठाकरे एवढा विरोध का करत आहेत? हनुमान चालिसा वाचण्यासाठी महाविकास आघाडी सरकारकडून परवानगी घ्यावी लागेल? ज्या हिंदूंच्या नावावर आपण मतं जमा करतो, सत्तेवर येतो, मुख्यमंत्री बनतो, तिथं हनुमान चालिसाचा इतका विरोध का? आज जर बाळासाहेब असते तर त्यांनी सन्मानाने म्हटलं असतं की मातोश्रीच्या समोर बसून तुम्ही हनुमान चालिसा पठण करा. मला हे कळत नाही की एवढा विरोध करून उद्धव ठाकरे महाराष्ट्राला कोणता संदेश देत आहेत? आज महाराष्ट्रात हाहाकार माजला आहे, शेतकरी संकटात आहे, बेरोजगारी वाढलेली आहे, विकासाची कामं थांबलीयेत, मुख्यमंत्री दोन दोन वर्षं मंत्रालयात जात नाहीयेत. कोणत्या जिल्ह्यात शेतकऱ्याच्या बांधावर मुख्यमंत्री पोचत नाहीत, अशा प्रकारचं ग्रहण मुक्त करण्यासाठी आम्हाला हनुमान चालिसा वाचायची आहे.