( Rohit Pawar ) माणिकराव कोकाटे गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. कोकाटे यांचा मोबाईलवर 'रमी' गेम खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओनंतर विरोधकांनी जोरदार टीका करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. याच पार्श्वभूमीवर आता माणिकराव कोकाटे यांच्याकडून कृषिखाते काढून घेण्यात आले आहे. तर राज्याचे नवे कृषिमंत्री म्हणून दत्तात्रय भरणे हे कारभार पाहणार आहेत. त्यामुळे आता माणिकराव कोकाटे यांच्याकडे क्रीडा आणि युवक कल्याण मंत्रालयाची जबाबदारी असणार आहे.
याच पार्श्वभूमीवर आता रोहित पवार यांनी ट्विट केलं आहे. रोहित पवार म्हणाले की, 'कोणतेही मंत्रीपद ही मोठी जबाबदारी असते आणि त्या पदावरील व्यक्ती जबाबदारीने न वागल्यास त्या पदाला न्याय न देऊ शकल्यास सर्वसामान्यांना त्याचा फटका बसतो. तसंच काहीसं कोकाटे साहेबांच्या बाबतीत झालं होतं आणि त्याचा फटका सर्वसामान्य शेतकऱ्यांना बसत होता, म्हणूनच त्यांच्या राजीनाम्याची मागणी होती.
'सरकारने कोकाटे साहेबांच्या राजीनाम्याऐवजी कृषी खाते काढून क्रीडा खाते देण्याचा निर्णय घेतला. क्रीडा खाते देखील युवांच्या दृष्टीने महत्वाचे असून या खात्यात काम करताना भूतकाळातील चुका टाळून आपल्या अनुभवाचा योग्य तो वापर करून क्रीडा क्षेत्रास न्याय देतील तसेच नवे कृषिमंत्री दत्ता मामा भरणे शेतकऱ्यांना न्याय देत या खात्याला लागलेले वादांचे ग्रहण दूर करतील, ही अपेक्षा.'
यासोबतच ते पुढे म्हणाले की, 'कोणत्याही खात्यात गलथान कारभार होऊन सर्वसामान्यांना फटका बसत असेल तर संपूर्ण सरकार त्यासाठी जबाबदार असते, त्यामुळे खातेबदल केला म्हणजे आपण सुटलो असा गैरसमज नेतृत्वाने करून घेऊ नये. आमचे सर्वच खात्यावर लक्ष राहते आणि राहणार आहे. कोणत्याही मंत्र्यांचा असंवेदनशीलपणा महाराष्ट्र खपवून घेणार नाही, त्यामुळे सर्वच मंत्री जबाबदारीने वागतील, ही अपेक्षा'असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.