(Rohit Pawar) कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा मोबाईलवर रमी गेम खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने माणिकराव कोकाटे यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. याच्याआधी मंत्री माणिकराव कोकाटे हे त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे अनेकदा वादात अडकले होते.आता या व्हिडिओमुळे त्यांच्यावर टीका होत आहे.
राजकीय वर्तुळातून यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. यातच आता माणिकराव कोकाटेंबाबतचा विधीमंडळाचा चौकशी अहवाल समोर आला आहे. याच पार्श्वभूमीवर आता रोहित पवार यांनी ट्विट केलं आहे. रोहित पवार म्हणाले की, 'कृषिमंत्री सभागृहात केवळ ४२ सेकंद पत्ते खेळत नव्हते तर तब्बल १८ ते २२ मिनिटे पत्ते खेळत असल्याचा विधानमंडळाच्या चौकशीचा अहवाल असून हा अहवाल मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांच्याकडे देखील सादर केला असल्याची माहिती आहे.'
'सरकार याबाबत खुलासा करेल का? सभागृहात तब्बल १८ ते २२ मिनिटे पत्ते खेळणाऱ्या कृषिमंत्र्यावर हे सरकार कारवाई करणार नसेल तर मुख्यमंत्र्यांना स्व. अटलजींच्या तर उपमुख्यमंत्री अजितदादांना स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारांचा वारसा सांगण्याचा नैतिक अधिकार उरतो का?'असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.