राजकारण

भारताला विजयी करण्यासाठी ‘इंडिया’ ची वज्रमूठ सज्ज; सामनातून निर्धार

आज देशातील प्रमुख विरोधी पक्षांचे नेते मुंबईतील ग्रँड हयातमध्ये दाखल होतील.

Published by : Siddhi Naringrekar

आज देशातील प्रमुख विरोधी पक्षांचे नेते मुंबईतील ग्रँड हयातमध्ये दाखल होतील.आज आणि उद्या देशभरातील विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीची मुंबईत बैठक होणार आहे. या बैठकीच्याआधी ठाकरे गटाच्या सामनाच्या अग्रलेखातून या बैठकीवर भाष्य करण्यात आले आहे. सामनाच्या अग्रलेखातून म्हटले आहे की, देशभरातील प्रमुख नेते मुंबईत उतरले आहेत. लालू यादव पाटण्याहून मुंबईला निघाले तेव्हा विमानतळावर त्यांना पत्रकारांनी विचारले, ‘मुंबईत का निघाला आहात?’ लालूंनी त्यांच्या स्टाईलने उत्तर दिले, ‘मोदींच्या नरडय़ावर बसण्यासाठी!’ मोदी ही व्यक्ती नसून लोकशाहीचा मुडदा पाडणारी हुकूमशाही प्रवृत्ती आहे. त्या प्रवृत्तीशी हा लढा आहे. ‘पी.एम. मोदी की गर्दन पर चढने जा रहे है!’ असे लालू यादव सांगतात. ही लोकांची संतप्त भावना आहे. त्याच संतापाच्या ठिणगीतून ‘इंडिया’ आघाडीचा जन्म झाला आहे. ‘इंडिया’ आघाडीच्या आतापर्यंत दोन बैठका झाल्या. मुंबईत तिसऱ्या बैठकीचे आयोजन आज व उद्या होत आहे. भाजपने इंडिया आघाडीची इतकी धास्ती घेतली की, स्वयंपाकाचा गॅस 200 रुपये स्वस्त केला. बैठका वाढत जातील तशी ही स्वस्ताई वाढत जाईल. ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीची ही कमाल आहे. तीन वर्षांत स्वयंपाकाचा गॅस 1103 रुपयांवर जाऊन पोहोचला. तो ‘इंडिया’ आघाडीचा जोर वाढल्यावर खाली आला. ‘इंडिया’ सत्तेवर आल्यावर काय घडेल याची ही चुणूक आहे. ‘इंडिया’ आघाडीच्या मुंबईतील बैठकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

देशात कायद्याचे राज्य नाही. मणिपूर, जम्मू-कश्मीर, महाराष्ट्रात लोकशाही नाही. न्यायालयास प्रतिष्ठा नाही व केंद्रीय तपासयंत्रणांच्या माध्यमातून भयाचे साम्राज्य उभे केले गेले आहे. देशातील हे भयाचे साम्राज्य उलथवून टाकण्यासाठी ‘इंडिया’ आघाडीची पाऊले मजबुतीने पडत आहेत . चीनपुढे गुडघे टेकणाऱ्या आजच्या भारतास विजयी करण्यासाठी ही ‘इंडिया’ ची वज्रमूठ सज्ज आहे . राज्यांचा स्वाभिमान , प्रांतांची अस्मिता , सर्वच धर्मांचा मान राखून एक व्यक्ती व त्यांचे धनिक मित्रमंडळ नव्हे , तर भारत देश शक्तिमान व्हावा यासाठी ‘इंडिया’ चा गरुड पक्षी झेपावला आहे! मुंबईतील बैठकीचा तोच संदेश आहे!मणिपूर आजही धुमसते आहे. हरयाणात भाजपच्या लोकांनी आगी लावल्या. देशभरात वणवा पेटवून त्यांना निवडणुकांना सामोरे जायचे आहे, पण ‘इंडिया’ आघाडी हा कुटील डाव यशस्वी होऊ देणार नाही. ‘इंडिया’ आघाडीची ऐक्याची वज्रमूठ हळूहळू घट्ट होत आहे. 27 पक्ष एकत्र आले व त्यांच्यात कोणतीही ईर्षा नाही. भारतीय जनता पक्षाने कितीही टीका केली तरी ‘इंडिया’ आघाडी ही एक स्फोटक शक्ती आहे आणि ही शक्ती आपल्याला 2024 च्या आधीच उलथवून टाकेल अशी भीती त्यांना मनातून वाटते. ही भीती त्यांच्या कृतीवरून आणि अस्वस्थ हालचालींवरून दिसते.

राहुल गांधींना देशभरात प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा व शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा झंझावात आहे. ईडी, सीबीआयला घाबरायचे नाही व झुकायचे नाही. ‘आम्ही तुरुंगात जायला तयार आहोत. हिंमत असेल तर टाका आत,’ अशी हिंमत छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल व झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी दाखवली. हेच ‘इंडिया’ आघाडीचे यश आहे. असे सामनातून म्हटले आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा