राजकारण

अंतरवालीत अमानुष लाठीहल्ला व गोळीबाराचे आदेश देणारा जनरल डायर कोण? सामनातून सवाल

जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीमध्ये मराठा आरक्षणाच्या मागणी करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला.

Published by : Siddhi Naringrekar

जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीमध्ये मराठा आरक्षणाच्या मागणी करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. या घटनेमुळे राज्यभरातील वातावरण देखील चांगलेच तापले आहे. यावरूनच विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले आहे.

याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या सामनातीन अग्रलेखातून टीका करण्यात आली आहे. सामनातून म्हटले आहे की, स्वातंत्र्यलढय़ात अमृतसरमध्ये ब्रिटिशांनी जसे जालियनवाला बागेचे हत्याकांड घडवले, त्याच घटनेची आठवण व्हावी असा हा राक्षसी हल्ला होता. पोलिसांनी आंतरवालीमध्ये बळाचा जो अतिरेकी वापर केला, तो पाहता राज्यातील मिंधे सरकारला व फडणवीसांच्या गृहखात्यालाच मराठा आरक्षणाच्या मुद्दय़ावरून महाराष्ट्रात पेटवापेटवी करायची आहे काय? असा प्रश्न शांततेने आंदोलन करणाऱया मराठा समाजाला व महाराष्ट्राच्या जनतेलाही पडला आहे. जालना जिल्हय़ातील आंतरवाली सराटी या गावात जे घडले ते चीड आणणारे आहे. अतिरेकी वा नक्षलवाद्यांवर हल्ला चढवावा अशा पद्धतीने पोलिसांनी चहुबाजूने घेरून मराठा आंदोलकांवर अमानुष हल्ला चढवला. पोलिसांनी केलेला लाठीहल्ला इतका बेछूट होता की, आपण निरपराध महिला, मुले व वयोवृद्धांची डोकी फोडतोय, याचेही भान पोलिसांना राहिले नाही.

महाराष्ट्रातील मराठा, धनगर व अन्य काही समाज सातत्याने आरक्षणासाठी आंदोलने करत आहेत. मराठा समाजाने तर शांततेच्या मार्गाने लाखोंचे मोर्चे काढले. एक ठिणगी कुठे पडली असती तर वणवा पेटायला वेळ लागला नसता. पण मराठा आंदोलक सदैव संयम बाळगूनच आंदोलने करत असताना आंतरवाली सराटीत पोलिसांचा फौजफाटा घुसवून जालियनवाला बाग घडवण्याचे फर्मान फोनवरून कोणी सोडले? आंतरवालीत अमानुष लाठीहल्ला व गोळीबाराचे आदेश देणारा जनरल डायर कोण? याचा छडा लागलाच पाहिजे!

मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या न्याय्य मागणीची तड तर लागत नाहीच; पण या मुद्दय़ावरून आंदोलन करणाऱ्यांवर अमानुष लाठीहल्ला व गोळीबार करून मराठा समाजाच्या जखमेवर मीठ चोळण्याचे राक्षसी कृत्य राज्यातील मिंधे-फडणवीसांच्या ट्रिपल इंजिन सरकारने केले आहे. आंतरवालीच्या घटनेनंतर झालेला उद्रेक पाहून सटपटलेल्या सरकारने आता जालन्याच्या पोलीस प्रमुखांना सक्तीच्या रजेवर पाठवले; पण या प्रकरणात पोलिसांपेक्षा अधिक दोष उपोषण चिरडण्याचे आदेश देणाऱ्या जनरल डायरचा आहे. त्याच्यावर कारवाई करण्याची हिंमत मिंध्यांकडे आहे काय? असे सामनातून म्हटले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Sanjay Shirsat Special Report : सामाजिक न्याय विभाग पुन्हा वादात, टेंडर प्रक्रियेत नियमांची पायमल्ली?

Latest Marathi News Update live : 'ज्यांना सगळं काही दिलं ते गद्दार झाले'; आदित्य ठाकरेंचा शिंदे गटाला टोला

Tesla's First Showroom In BKC : भारतात टेस्लाची एंट्री; मुंबईतील बीकेसी येथे सुरू होणार पहिलं शोरूम

Monika Bhadoriya : 'तारक मेहता...'मधील अभिनेत्रीनं निर्मात्याच्या 'त्या' आक्षेपार्ह विधानामुळं केला जीवन संपवण्याचा विचार; घडलं असं की....