राजकारण

अदानी म्हणजे ‘रिझर्व्ह बँक ऑफ बीजेपी’; संजय राऊतांचा घणाघात

अब्जाधिश गौतम अदानी आणि अदानी समूहाची चहूबाजूला चर्चा रंगली आहे. अमेरिकेतील संशोधन कंपनी, हिंडेनबर्गने आपला एक खळबळजनक अहवाल प्रकाशित केला.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : अब्जाधिश गौतम अदानी आणि अदानी समूहाची चहूबाजूला चर्चा रंगली आहे. अमेरिकेतील संशोधन कंपनी, हिंडेनबर्गने आपला एक खळबळजनक अहवाल प्रकाशित केला. या अहवालामुळे अदानी समूहातील जवळपास सर्वच शेअर्समध्ये मोठी घसरण झाली असून तर त्यांचा नेटवर्थही कमी झाली. परिणामी, अदानी जगातील टॉप 20 श्रीमंतांच्या यादीतून बाहेर पडले आहेत. यावरुन शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी सामना रोखठोकमधून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. गौतम अदानी यांचे आर्थिक साम्राज्य तकलादू पायावर उभे होते. हिंडेनबर्गच्या एका अहवालाने त्यांचे राज्य कोसळले. अदानी म्हणजे भारत हे सांगणे भारतमातेचा अपमान. अदानी व मोदी, भाजप या एकाच नाण्याच्या दोन बाजू, अशा शब्दात त्यांनी टीका केली आहे.

गौतम अदानी प्रकरणाने देश ढवळून निघाला आहे व जगात भारतीय अर्थव्यवस्थेची लक्तरे निघाली आहेत. एखाद्दुसऱ्या उद्योगपतींच्या करंगळीवर एखाद्या महान देशाच्या अर्थव्यवस्थेचा डोलारा उभा असावा हे हास्यास्पदच होते, पण गेल्या सात-आठ वर्षांत हा पोकळ डोलारा उभा राहिला. ही करंगळी अदानी यांची होती की प्रत्यक्ष आपले पंतप्रधान मोदी यांची, हाच संशोधनाचा विषय आहे. मुळात गौतम अदानी व त्यांच्या उद्योगाचे साम्राज्य तकलादू पायावरच उभे होते. अमेरिकेतील ‘हिंडेनबर्ग रिसर्च’च्या एका फुंकरीने ते कोसळले. त्याचा फटका देशाला बसला. भारतीय अर्थव्यवस्थेची इतकी मोठी लूटमार सिद्ध होऊनही भाजप गप्प आहे. यामुळे ते सिद्धच झाले. अदानी यांच्याकडे भाजपचा पैसा गुंतला आहे.

देशातील आतापर्यंतचा सर्वात मोठा आर्थिक घोटाळा यानिमित्ताने समोर आला व विरोधकांच्या घरी पाच-दहा लाखांच्या व्यवहारासाठी ईडी, सीबीआयची पथके पाठवणारे भाजप सरकार इतक्या मोठय़ा घोटाळय़ावर गप्प आहे!

मुंबई व दिल्लीच्या तुरुंगात ‘ईडी व सीबीआय’ने अनेक प्रतिष्ठत उद्योगपतींना पाच-पंचवीस कोटींच्या व्यवहारासाठी डांबून ठेवले आहे. त्यांच्यावर मनी लाँडरिंग, बोगस कंपन्या स्थापन करून व्यवहार केल्याचे आरोप आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर गौतम अदानी व त्यांच्या कंपन्यांनी केलेले व्यवहार हे धक्कादायक आहेत.

अदानी, अंबानी यांची संपत्ती वाढणे हा अपराध नाही; पण देशाच्या मालमत्ता फुकटात त्यांच्या खिशात टाकणे हा राष्ट्रद्रोह आहे. ते गेल्या सात वर्षांत झाले. अदानी हे भाजप राजवटीचे सगळय़ात मोठे लाभार्थी ठरले! अदानी यांच्याबाबतीत जे घडले ते काँग्रेस राजवटीत घडले असते तर भाजपची भूमिका काय असती? राजकारणात पैसे फक्त आपल्याकडेच असावेत व त्यातला मोठा वाटा फक्त अदानींकडे असावा, हेच त्यांचे धोरण होते. अदानी म्हणजे ‘रिझर्व्ह बँक ऑफ बीजेपी’ होती. त्या भाजपच्या रिझर्व्ह बँकेवरच सगळय़ात मोठा हल्ला झाला. यामागे देशातील उद्योगपती नाहीत. जगातील प्रमुख शक्तींनी भाजपच्या रिझर्व्ह बँकेवर हल्ला करून एकप्रकारे नरेंद्र मोदी यांना इशारा दिला आहे.

अदानी प्रकरण वाटते तितके सहज नाही. ते फक्त कॉर्पोरेट युद्ध नाही. भारतीय जनता पक्ष, त्यांचे आर्थिक व्यवहार, लोकशाहीचा गळा घोटून पैशाच्या ताकदीवर सत्ता टिकवण्याच्या प्रवृत्तीवर झालेला हा हल्ला आहे. भविष्यात असे आणखी हल्ले होतील. त्याचे परिणाम 2024 ला दिसतील. भारतमातेच्या उदरात काय दडले आहे, याची ही एक झलक आहे, असेही संजय राऊत म्हंटले आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

PM Narendra Modi : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील सर्वाधिक सन्मानित व्यक्ती

Malnourished Children : राज्यात कुपोषित बालकांचा आकडा धडकी भरवणारा ; महिला आणि बालविकास मंत्र्यांची माहिती

Deepika Padukone : दीपिका पदुकोण हॉलिवूडमध्ये इतिहास रचणार! 'Walk of Fame'वर स्थान मिळवणारी पहिली भारतीय अभिनेत्री

Shubman Gill : शुभमन गिलचे इंग्लंडमध्ये ऐतिहासिक दुहेरी शतक; भारतीय क्रिकेटसाठी नवा अध्याय