मुंबई : मोदी आडनाव प्रकरणी काँग्रेस नेते आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. आता त्यांच्या संसद सदस्यत्वावरून राजकारण सुरू झाले आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यावर निशाणा साधला आहे. सुप्रीम कोर्टाने निर्णय दिल्यानंतरही राहुल गांधींना संसदेत घेतलं नाही. लोकसभा अध्यक्षांना त्यावर पीएचडी करायची आहे का, असा खोचक सवाल त्यांनी विचारला आहे.
संजय राऊत म्हणाले की, सरकार राहुल गांधींना घाबरले आहे आणि घाबरत आहे. सुरत कोर्टाने निकाल दिल्यानंतर 26 तासांमध्ये राहुल गांधींना अपात्र करण्यात आलं. परंतु, आता सुप्रीम कोर्टाने निर्णय दिल्यानंतर तो 72 तास उलटले तरी देखील त्यांना संसदेत घेतलं नाही आणि आता लोकसभा अध्यक्ष म्हणतात आम्ही अभ्यास करू? काढून टाकण्यापूर्वी तुम्ही अभ्यास केला होता का? आज तुम्ही काय करत आहात? तुम्हाला त्या विषयावर पीएचडी करायची आहे का, असा खोचक सवाल त्यांनी विचारला आहे.
अनेक महत्त्वाचे विषय चर्चेला येत आहेत. दिल्ली सरकारसंदर्भात असलेला ऑर्डिनेन्स मणिपूर हिंसा अविश्वास ठराव या चर्चेपासून राहुल गांधींना दूर ठेवण्यासाठी हा निर्णय घेतला जात आहे. केंद्र सरकार सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा ऐकायला तयार नाही. उद्या आम्ही सगळे एकत्र बसू आणि कोणती पावलं उचलायची यावर निर्णय घेऊ, असेही राऊतांनी सांगितले आहे.