राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल एकाच मंचावर आले होते. शरद पवार यांच्या हस्ते राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सन्मान करण्यात आला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला असून एकनाथ शिंदे यांचा खास सन्मान करण्यात आला.
याच पार्श्वभूमीवर आता संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत म्हणाले की, माननीय पवार साहेबांकडे चुकीची माहिती आहे. ठाण्याचे राजकारण योग्य दिशेनं नेण्याचे काम गेल्या 30 वर्षामध्ये शिवसेनेनं केलं. त्यांना माहित नसेल तर सांगतो, ठाण्याचा विकास हा सतिश प्रधान यांच्या काळात झाला. त्यांना विकासाची दृष्टी होती, त्यांनी टेंडरबाजी केली नाही. त्यानंतर शिवसेनेचं अनेक महापौर झाले. एकनाथ शिंदे ठाण्याचा राजकारणात फार उशिरा आले. पवार साहेबांना जर माहिती हवी असेल तर राजन विचारे ते त्यांना माहिती द्यायला जातील, आम्ही पाठवू. एकनाथ शिंदे हे फार उशिरा आमदार झाले आणि त्यानंतर ठाण्याची वाट लागायला सुरवात झाली.
शरद पवार साहेबांनी काल त्यांचा सत्कार केला आहे. अमित शाहांनी उत्तर दिलं पाहिजे. शिंदेंचा पक्ष अमित शाहांचाच पक्ष. काल शरद पवार साहेबांनी शिंदेंचा सत्कार केला नाही तर अमित शाहांचा सत्कार केला. महाराष्ट्राचे तुकडे पाडणाऱ्या, महाराष्ट्राचे उद्योग पळवून नेणाऱ्या अमित शाहांचा सत्कार. त्यांच्या मुखियांचा सत्कार आमचे शरद पवार साहेब करत आहेत हे दुर्दैव आहे. आम्ही आमच्या पक्षाच्या भावना मांडल्या. या माझ्या भावना नसून आमच्या पक्षाच्या भावना आहेत. साहित्य संमेलन म्हणजे दलाली सुरु आहे. कोणालाही कसेही पुरस्कार देत आहेत. कुणाचे कसेही सत्कार करत आहेत.
यासोबतच ते पुढे म्हणाले की, माझा आयोजकांना प्रश्न आहे, तुम्ही दिल्लीमध्ये दलाली करायला आला आहात का? मला निमंत्रण दिलेलं आहे पण मी अजिबात जाणार नाही. मराठीचा एवढा घोर अपमान मी दिल्लीच्या राजधानीत पाहिला नाही. एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचे सरकार पाडलं. बेईमानी केली. त्यांच्या कार्यक्रमाला शरद पवारांनी जायला नाही पाहिजे होते. ज्यांना आम्ही महाराष्ट्राचे शत्रू समजतो. त्यांच्याबरोबर जे लोकं खुलेआम बसलेले आहेत. तर त्यांना अशाप्रकारचे सन्मान आपल्या हातून देणं हे महाराष्ट्राच्या अस्मितेला आणि स्वाभिमानाला धक्का देणारे आहे. आम्हाला तुमचं दिल्लीतलं जे राजकारण आहे ते आम्हाला माहित नाही, आम्हालाही राजकारण कळतं माननीय पवार साहेब. असे संजय राऊत म्हणाले.