राजकारण

भाजपबरोबर जातील ते राजकीय आत्महत्या करतील; राऊतांनी सांगितले पवार-ठाकरे भेटीत काय घडले?

उध्दव ठाकरे व शरद पवार यांच्या भेटीतील तपशील अद्याप गुलदस्त्यात होता. या भेटीत नेमके काय घडले हे ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सांगितले आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : राज्यात सध्या राजकीय वातावरण ढवळून निघत आहे. ठाकरे गटाचे नेते उध्दव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली होती. उध्दव ठाकरे स्वतः शरद पवारांच्या निवासस्थानी सिल्व्हर ओक येथे गेले होते. तब्बल सव्वा तास या दोघांमध्ये चर्चा झाली असून तपशील अद्याप गुलदस्त्यात होता. या भेटीत नेमके काय घडले हे ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सांगितले आहे.

मंगळवारी संध्याकाळी उद्धव ठाकरे यांच्याबरोबर शरद पवारांना भेटलो. ते म्हणाले, कोणालाही मनापासून सोडून जायचे नाही, पण कुटुंबाला टार्गेट केले जात आहे. कुणाला काही व्यक्तिगत निर्णय घ्यायचे असतील तर तो त्यांचा प्रश्न, पण ’पक्ष’ म्हणून आम्ही भाजपबरोबर जाण्याचा निर्णय घेणार नाही. महाराष्ट्रातील लोकांत सध्याच्या सरकारबद्दल कमालीचा संताप आहे. जे आता भाजपबरोबर जातील ते राजकीय आत्महत्या करतील असे पवार-ठाकरे यांचे मत पडले, असे त्यांनी म्हंटले आहे.

ईडीच्या दहशतीने लोकांना फोडणे हे सभ्य लोकांचे राजकारण नाही. राजकारणात राहून लोकांनी अमाप संपत्ती कमावली. ती टिकविण्यासाठी त्यांना सत्तेची कवचकुंडले हवीच असतात. घाऊक पक्षांतरे त्यातून होतात. पवार यांनी एक चांगला मुद्दा मांडला, आज जे भीतीने पक्ष सोडत आहेत त्यांना मी सांगतो, तुम्ही भाजपात गेल्याने टेबलावरची फाईल कपाटात जाईल, पण या ईडी-सीबीआयच्या फाईली कधीच बंद होत नाहीत, असे शरद पवार म्हणाल्याचे संजय राऊतांनी सांगितले.

एकनाथ शिंदे यांनाही तुरुंगात जायचे नव्हते. म्हणून त्यांनी भाजपचा मार्ग स्वीकारला. ते सरळ बेइमानांचे सरदार झाले, असा निशाणा त्यांनी साधला आहे. शिंद्यांबरोबर गेलेल्या 11 आमदार व 6 खासदाराच्या फायली सध्या टेबलावरून कपाटात गेल्या आहेत. शिंदे गटाप्रमाणे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांच्या अशा किती फायली कपाटात जातील ते पाहायचे. आज राज्याचे चित्र काय आहे? शिंदे सरकारचे मंत्री मंत्रालयात जात नाहीत. देवेंद्र फडणवीस ‘सागर’ बंगल्यावरून काम करतात. शिंदे यांच्या ताब्यात ‘वर्षा’सह तीन सरकारी बंगले आहेत. शिंदे यांचे चिरंजीव प्रशासनात सरळ हुल्लडबाजी करतात. त्यामुळे मंत्रालयापासून सर्वत्र अस्वस्थता आहे. सरकार कोठे चालले आहे? ते मंत्रालयातच झोपले आहे, अशी जोरदार टीकाही त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा