राजकारण

भाजपनेच कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना लिहून दिलेले 'हे' स्क्रिप्ट; राऊतांचा आरोप

सांगली जिल्हयातील जत तालुक्यातील गावांवर दावा केल्यानंतर आता अक्कलकोटवरही कर्नाटक मुख्यमंत्र्यांनी दावा केला आहे. यावरुन संजय राऊत यांनी भाजपवर आरोप केला आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : सांगली जिल्हयातील जत तालुक्यातील गावांवर दावा केल्यानंतर आता अक्कलकोटवरही कर्नाटक मुख्यमंत्र्यांनी दावा केला आहे. यावरुन राज्यात वातावरण तापले असून कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांसह शिंदे-फडणवीस सरकरावर टीकेची झोड उठली आहे. अशातच शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर मोठा आरोप केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमान विषयावरुन लक्ष विचलीत होण्यासाठीच भाजपनेच कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना लिहून दिलेले हे स्क्रिप्ट आहे, असे त्यांनी म्हंटले आहे.

संजय राऊत म्हणाले की, कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी महाराष्ट्रवर हल्ला केला आहे. हे युध्द आहे. यामागे फार मोठे कारस्थान आहे. महाराष्ट्रात भाजपच्या नेत्यांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झालेला आहे. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी आणि भाजप प्रवक्ते सुध्दांशु त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर चिखलफेक केली आहे. यामुळे महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकराविरोधात संतापाची लाट उसळली आहे. यावरचे लक्ष विचलित व्हावे व छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानाचा विषय मागे पडावा म्हणून बोम्मईंना पुढे करुन सीमा भागावरती हक्क सांगण्याचा प्रयत्न केला जात आहे.

आजपर्यंत देशभरातील भाजपच्या एकाही मुख्यमंत्र्याने दुसऱ्या राज्याच्या भाजप मुख्यमंत्र्यांवर कधीही हल्ला करताना दिसत नाही. तो एक शिस्तबध्द पक्ष आहे. यामुळे कर्नाटकच्या भाजपचे मुख्यमंत्री महाराष्ट्रच्या भाजपच्या मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यावर बोलणे हे ठरलेले स्क्रिप्ट आहे. महाराष्ट्रात शिवाजी माहारांजांचा विषयावरुन लोकांचे लक्ष विचलित करावे. संताप कमी करावा आणि या विषयाकडे वळावे यासाठी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना लिहून दिलेले हे स्क्रिप्ट आहे.

शिंदे-फडणवीस सरकारमध्ये हिंमत नाही. ते दुबळे आहेत. परंतु, शिवसेना आहे. हिंदुहदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी तीन महिने तुरुंगवास भोगला आहे आणि शिवसेनेने 69 हुतात्मे दिले आहेत. आणखी हुतात्मे द्यावे लागले तरी आम्ही देऊ आणि तुरुंगांत जाऊ. आम्हाला तुरुंगाची भीती नाही. एक इंचसुध्दा जमीन देणार नाही.

महाराष्ट्रात नवे महाभारत घडू शकते. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या बोलण्यावर महाराष्ट्राचा विश्वास नाहीये. त्यांना खोके दिले की हे गप्प बसतील. महाराष्ट्राला विसरतील. पण, शिवसेना विसरणार नाही. तुम्ही किती कारस्थाने केली तरी महाराष्ट्राची जनता सहन करणार नाही. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंनी रणशिंग फुंकलेले आहे. आणि महाराष्ट्राच्या सर्वात मोठ्या लढाईसाठी आम्ही तयार आहोत. आणि ती लढाई कोणत्याही थराला जाईल, असा इशाराही संजय राऊतांनी शिंदे-फडणवीस सराकारला दिला आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा