मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार असल्याचे भाकीत वर्तविले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. याला शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. अजित पवार-शरद पवार ही मोठी राजकीय माणसे आहेत. ९५ सालीही अजित पवारांनी सरकार पाडलं नाही. तेव्हा कुठे गेले होते ते, असा सवाल त्यांनी विचारला आहे.
शहाजी बापू पाटील म्हणाले की, सरकार पाडणार अशी भाकितं यापूर्वीही अनेकदा करण्यात आली आहेत. अजित पवार व शरद पवार ही मोठी राजकारणी माणसं आहेत. ९५ सालीही अजित पवारांनी सरकार पाडलं नाही. तेव्हा कुठे गेले होते ते? कुठल्या गावाला गेले होते अजित पवार? त्यावेळी शिवसेना-भाजपाच्या १०० जागाही नव्हत्या. ते तुम्हाला पाडता आलं नाही. आणि आता खणखणीत १७५ आमदारांचं बहुमत असलेलं सरकार आहे. ते तुम्ही पाडणार आहात. तुम्ही एवढे बुद्धीवान आहात का? उगीच त्यांचे कार्यकर्ते अडवण्यासाठी ते करत आहेत, अशी टीका त्यांनी राष्ट्रवादीवर केली आहे.
दरम्यान, राज्यातील एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली असलेलं सरकार राष्ट्रवादीच्या अधिवेशनानंतर पडेल, असे भाकित राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी वर्तवले होते. तर, जोपर्यंत १४५ आमदार एकनाथ शिंदेंच्या पाठिशी आहेत, तोपर्यंत हे सरकार चालेल. ज्यादिवशी हा आकडा कमी होईल, त्या दिवशी हे सरकार जाईल, असे विधान अजित पवार यांनी केले होते.