नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह कोणाचा यावर आज केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणी झाली आहे. या सुनावणीसाठी शरद पवार खुद्द उपस्थित राहिले आहेत. यावेळी अजित पवार गटाने शरद पवारांवर आरोप करत जोरदार युक्तीवाद केला आहे. तर, शरद पवार गटाने सुनावणी होईपर्यंत पक्षचिन्ह गोठवू नये, अशी विनंती निवडणूक आयोगाल केली आहे. यामुळे घड्याळ चिन्ह गोठणार की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
निवडणूक आयोगात सुनावणीवेळी शरद पवार गटाकडून संविधानाचा दाखला देण्यात आला आहे. राष्ट्रवादीवर अजित पवार दावा करू शकत नाही. राष्ट्रवादी पक्ष पवारांनी स्थापन केला आहे. राष्ट्रवादी पक्ष कोणाचा हे सर्वांना माहिती आहे. एक गट बाहेर पडला असला तरी मूळ पक्ष आमच्याकडे असून 24 प्रदेशाध्यक्ष, बहुसंख्य आमदारांचा शरद पवारांना पाठिंबा असल्याचे शरद पवार गटाने म्हंटले आहे.
शरद पवारांची अध्यक्ष म्हणून निवड पक्षघटनेला अनुसरून केली आहे. त्यामुळे त्यांनी घेतलेले निर्णय डावलता येणार नाही. निर्णय होईपर्यंत चिन्ह आमच्याकडे ठेवा, अशी मागणी शरद पवार गटाने केली आहे. निर्णय होत नाही तोपर्यंत चिन्ह गोठवू नका, अशी विनंतीही शरद पवार गटाने निवडणूक आयोगाला केली आहे.
दरम्यान, निवडणूक आयोगात शरद पवार यांच्याकडून अभिषेक मनू सिंघवी तर अजित पवार गटाकडून नीरज किशन कौल आणि मनिंदर सिंह हे युक्तिवाद केला आहे. आमदारांची संख्या आमच्या बाजूने अधिक असल्याचा दावा अजित पवार गटाने केला आहे. तर, जयंत पाटील यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती बेकायदेशीर असल्याचेही अजित पवार गटाने म्हंटले आहे.