शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून जबाबदारी मिळाल्यानंतर पहिल्यांदाच शिवेंद्रराजे भोसले यांचे सातारा जिल्ह्यात आगमन झाले. मोठ्या जल्लोषात त्यांचे स्वागत करण्यात आले होते.
याच पार्श्वभूमीवर ते प्रतिक्रिया देताना म्हणाले की, जिल्ह्याच्यावतीने मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी आणि अमित शाह यांचे जिल्ह्याच्यावतीने आभार मानले पाहिजे. सातारा जिल्ह्याने भारतीय जनता पार्टीला लोकसभेपासून साथ दिली. लोकसभेला उदयनराजेंना निवडून आणण्यामध्ये सातारा जिल्ह्यातील सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आणि मतदारांनी पक्षावर विश्वास ठेवला. विधानसभेच्या निवडणुकीतसुद्धा चारही जागा भाजपने ज्या लढवल्या त्या चारही जागा सातारा जिल्ह्यातील मतदारांनी निवडून दिल्या.
यासोबतच पालकमंत्रिपदाविषयी बोलताना ते म्हणाले की, हा निर्णय मुख्यमंत्र्यांचा आहे, जसे खात्यांच्याबाबतीत मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला तसे पालकमंत्र्यांच्याबाबतीतसुद्धा देवेंद्रजी असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील आणि अजितदादा असतील तिघं मिळून निर्णय घेतील.