राजकारण

'फडणवीसांचे बोल हे लबाड कोल्ह्याचे आवतण, शिवरायांचं नाव घेऊन कृती औरंगजेबाची'

सामना अग्रलेखातून शिवसेनेचा भाजपवर हल्लाबोल

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : आगामी महापालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने कंबर कसली आहे. विशेषतः मुंबई महापालिकेसाठी भाजपाने तयारी सुरु केली असून ‘बाळासाहेबांचे स्वप्न साकार करण्यासाठी भाजपास मते द्या, असे भाजपने म्हंटले होते. नेमके याच विधानावरुन आज शिवसेनेने सामना अग्रलेखातून भाजपवर शरसंधान साधले आहे. हे लोक अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवाणी या मायबापांना विसरले ते बाळासाहेबांचे स्वप्न कसले साकार करणार, अशी टीका शिवसेनेने भाजपवर केली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दोन दिवसांपूर्वी ‘बाळासाहेबांसाठी भाजपास मते द्या!’ असे आवाहन केले. त्यावर आम्ही म्हणतो, ‘बाळासाहेबांच्या नावावर कसली मते मागता? तुमचं ते मोदी पर्व, मोदी वादळ ओसरलं काय?’ मुंबई महानगरपालिकेत या मंडळींना शिवसेनेचा पराभव करायचा आहे व शिवसेनेचा पराभव करण्यासाठी ते बाळासाहेबांच्याच नावाचा वापर करीत आहेत. मुंबईचा महापौर त्यांना भाजपचाच म्हणजे फडणवीस वगैरे पुढारी बाळासाहेबांचे स्वप्न उराशी कवटाळून बसले आहेत.

2014 मध्ये शिवसेनेशी ‘युती’ तोडताना या महामंडलेश्वरांना बाळासाहेब आठवले नाहीत. 2019 मध्ये मुख्यमंत्रीपदाबाबत दिलेला शब्द तोडतानाही त्यांना बाळासाहेबांच्या स्वप्नांचे स्मरण झाले नाही. आता मोठे आले बाळासाहेबांचे स्वप्न साकार करायला! फडणवीसांचे बोल हे लबाड कोल्ह्याचे आवतण आहे. मुंबई-ठाणेकरांनी सावध राहायला हवे. राज्यात फक्त थिल्लरपणा सुरू आहे. बाळासाहेबांचे स्वप्न वगैरे ही भाजपच्या तोंडची भाषा हे कारस्थान आहे. हे लोक अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवाणी या मायबापांना विसरले ते बाळासाहेबांचे स्वप्न कसले साकार करणार, असा प्रश्नदेखील त्यांनी विचारला आहे.

शिवसेना म्हणजे जनतेची शक्ती आहे. ही शक्ती दुर्बल होऊ नये म्हणून आम्ही तळमळतो. हेच बाळासाहेबांचे स्वप्न आहे. शिंदे गटाचे मुख्यमंत्रीपद हा साबणाचा बुडबुडा आहे. महाराष्ट्रात चीड आहे, संताप आहे. आम्ही शिवसेनेच्या उपनेत्यांना महाराष्ट्रात पाठवले आहे. आदित्य चांद्यापासून बांद्यापर्यंत फिरत आहे. लोकांचा प्रचंड प्रतिसाद त्याला मिळत आहे. लवकरच आम्ही स्वतः महाराष्ट्र पिंजून नव्हे तर घुसळून काढणार आहोत. गद्दारांना त्यांची जागा दाखवून देऊच, पण शिवसेना फोडणाऱ्यांनाही याच जमिनीत गाडून दाखवू. हेच बाळासाहेबांचे स्वप्न आहे.

शिवरायांचा महाराष्ट्र आहे असे तोंडाने बोलायचे व कृती औरंगजेबाची करायची. हे धंदे चालणार नाहीत. मुंबई गिळायची हे तुमचे स्वप्न शिवसेना पूर्ण होऊ देणार नाही. हेच बाळासाहेबांचे स्वप्न! घोडा मैदान लांब नाही. तोपर्यंत शिंदे गटाकडून तेल मालीश करून घ्या, अशा शब्दात शिवसेनेने भाजपवर टीकास्त्र डागले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?