राजकारण

Shivsena : फुटीचे नजराणे दिल्लीकडे अर्पण करण्यात मुख्यमंत्री मश्गुल

शिवसेनेची सामनामधून बंडखोर खासदारांवर टीकास्त्र

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : आमदारांनंतर आता शिवसेनेच्या (Shivsena) 12 खासदारही शिंदे गटात (Shinde Group) सामील झाले आहेत. यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. यावर शिवसेनेचे मुखपत्र सामानामधून (Saamana) जोरदार टीका करण्यात आली आहे. फुटीचे नजराणे दिल्लीश्वरांच्या चरणी अर्पण करण्यात मुख्यमंत्री मश्गुल आहेत, अशा शब्दांत शिवसेनेने आता बंडखोर खासदारांवर टीका केली आहे.

महाराष्ट्राची सूत्रे आज संपूर्णपणे दिल्लीच्याच हाती आहेत. शिवरायांच्या महाराष्ट्राची इतकी दारुण अवस्था कधीच झाली नव्हती. शिवसेना फोडणे व त्या फुटीचे नजराणे दिल्लीश्वरांच्या चरणी अर्पण करणे यातच मुख्यमंत्री शिंदे मश्गुल आहेत. राज्य बुडते आहे. ते बुडाले तरी पर्वा नाही, अशी सध्याच्या सत्ताधाऱ्यांची धारणा आहे. मात्र त्या प्रलयात महाराष्ट्राचा स्वाभिमान व मराठी अस्मिताही गटांगळ्या खाताना दिसत आहे, हे गंभीर आहे. महाराष्ट्रावर सध्या अस्मानी संकट आहेच, पण सुलतानी संकटाने राज्य जास्त बेजार आहे. पूर्वीचे सुलतान मंदिरे पाडत होते, आजचे सुलतान शिवसेना फोडत आहेत. नाथांनी त्या संकटात 'बये दार उघड' अशी आरोळी ठोकून महाराष्ट्राचे मन जागे केले होते. आजचा महाराष्ट्र तसा जागाच आहे. तो लवकरच पेटून उठेल, असा इशाराही शिवसेनेने बंडखोर खासदारांना दिला आहे.

दिल्लीसमोर झुकल्याने, मोडून पडल्यानेच फुटीर गटाला मुख्यमंत्रीपद मिळाले हे आता उघड झाले. मुख्यमंत्री शिंदे दिल्लीत आले व शिवसेनेच्या बारा खासदारांसोबत त्यांनी शक्तिप्रदर्शन केले व त्याआधी म्हणे या सर्व शक्तिमान खासदारांना केंद्र सरकारने ‘वाय प्लस’ दर्जाची सुरक्षा व्यवस्था पुरवली. या शक्तिमान, स्वाभिमानी खासदारांना इतके भय कोणाचे वाटत आहे? जनता आणि शिवसैनिक आपल्या सोबत असल्याचा दावा हे लोक करीत असतील व बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना म्हणजे आम्हीच असे ते बोलत असतील तर केंद्रीय सुरक्षा रक्षकांच्या वेढय़ात फिरण्याची गरज नाही. पण चोराच्या मनात चांदणे असा हा प्रकार आहे, असा टोलाही शिवसेनेने लगावला आहे.

दरम्यान, शिवसेनेच्या 12 खासदारांमध्ये श्रीकांत शिंदे, भावना गवळी, हेमंत गोडसे, राहुल शेवाळे, कृपाल तुमाने, श्रीरंग बारणे यांच्यासह 12 खासदारांचा समावेश आहे. या खासदारांनी गटनेतेपदी राहुल शेवाळेंच्या नियुक्तीचे पत्र लोकसभा अध्यक्षांना दिले. तसेच संसदेतील शिवसेना कार्यालय ताब्यात घेण्याचा हालचाली सुरु केल्या आहे. लोकसभा अध्यक्षांना लिहिलेल्या पत्रात दोन तृतीयांशपेक्षा जास्त खासदार असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे कार्यालय मिळण्याची मागणी केली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Uddhav Thackeray on Eknath Shinde : "एका गद्दाराने काल 'जय गुजरात' अशी घोषणा केली" उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेवर निशाणा

Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात चिमुकलीने जिंकली मनं ! राज ठाकरेंना म्हणाली 'I love You तर...

Raj & Uddhav Thackeray Melava : सुप्रिया सुळे यांनी आदित्य ठाकरे यांना खेचलं, स्टेजवर नेमकं काय घडलं?

Sushil Kedia Apologizes : मराठीबद्दल वादग्रस्त विधानानंतर अखेर सुशील केडियाने मागितली माफी