राज्यात सध्या प्रचंड राजकीय गोंधळ सुरु आहे. आरोप- प्रत्यारोपाचे त्यातच आता जालन्यातील काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल आणि शिंदे गटातील नेते अर्जुन खोतकर यांच्यात शाब्दिक युद्ध रागल्यांचे दिसून येत आहे. काल कैलास गोरंट्याल यांनी खोतकरांवर टीका केल्यानंतर आता खोतकर यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. गोरंट्याल म्हणजे, गटारगंगा लवकरच नगरपालिकेत झालेला भ्रष्टाचार बाहेर काढणार, असा इशारा अर्जुन खोतकरांनी दिला आहे.
नेमकं काय म्हणाले अर्जुन खोतकर?
गोरंट्याल यांच्या टीकेवर उत्तर देतांना खोतकर म्हणाले की, अरे ही गटारगंगा आहे, अशा लोकांवर काय बोलायचं? त्यांच्यावर बोलून मला माझं तोंड खराब नाही करायचं. गटारगंगा त्यांच्या तोंडात आहे. ते बोलतील त्यांना काय बोलायचं ते. मी लोकांवर काहीच टिका-टिप्पणी करणार नाही. लोकांना माहीत आहे मी काय आहे? जन्मतःच मी 300 एकरचा मालक आहे. काय सांगतात आम्हाला? यांची प्रकरणं काढतो आता आम्ही. असा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे.
काय म्हणाले होते गोरंट्याल?
तुम्ही स्वार्थासाठी शिवसेना पक्ष सोडून गेलेले आहात. तुम्हाला काहीतरी भेटलं पाहिजे; म्हणूनच तुम्ही शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी गद्दारी केली. तुम्ही काय होता, ठाकरे परिवारामुळे तुमचं अख्खं आयुष्य बदललं, त्यांच्यामुळे तुम्ही मोठे झालात. फाटलेल्या कपड्यावर तुम्ही सायकलवर फिरत होता. आज तुम्ही ज्या ठिकाणी पोचलात, ते फक्त उद्धव ठाकरे यांच्या घराण्यामुळे हे लक्षात ठेवा. आज त्यांना धोका देऊन तुम्ही पार्टी सोडून जाता? तुम्हाला शरम, लाज वाटली पाहिजे. स्वतःच्या स्वार्थासाठी कुठेही जाणार? उद्या उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, तर पाया पडून परत येणार, असं आहे का तुमच्याकडे? असे टीका आमदार कैलास गोरंट्याल यांनी अर्जुन खोतकर यांच्यावर केली होती.