राज्य सरकारकडून शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांची सुरक्षा काढण्यात आली आहे. त्यावरून राज्यात एकाच शिंदे- फडणवीस सरकारवर जोरदार टीका करण्यात येत आहे. त्यावरच आता संजय राऊत यांनी खळबळजनक विधान केले आहे. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, माझ्या जीवाला धोका आहे. हे सरकार माझ्या जीवाशी खेळत आहे. उद्या मला काही झालं तर त्याला हे सरकारच जबाबदार असेल, असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.
माझ्या घराची रेकी होते हे पोलिसांकडून कळलं आहे. मुंबईतील झालेल्या दंगलीपासून मला सुरक्षा व्यवस्था देण्यात आली होती. 25 ते 30 वर्ष मला सुरक्षा पुरवण्यात आली होती. पण ही सुरक्षा या सरकारने काढून घेतली. आम्ही मागितली नाही. मागणार नाही. मी सामनात बसतो. मी जिथे बसतो तिथली सुरक्षा काढली. तुरुंगातूनबाहेर जाताना आणि येताना मला सर्वाधिक सुरक्षा देण्यात येत होती. काही तरी होईल हे माहीत होतं. म्हणून सुरक्षा दिली होती. तरीही माझी सुरक्षा काढली. याचा अर्थ सरकार माझ्या जीवाशी खेळतंय. असे ते म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, आता काही झालं तरी मी सरकारकडे सुरक्षा मागणार नाही. कोणत्या नियमाने आणि कोणत्या भूमिकेतून सुरक्षा कोढली? माझी सुरक्षा काढण्याची शिफारस करण्याची शिफारस करणारी ही कोणती कमिटी आहे? कशासाठी सुरक्षा काढली?, असा सवाल देखील राऊत यांनी सरकारला केला आहे.
एका क्षणात माझी सुरक्षा काढली. कोणत्या कारणाने काढली मला माहीत नाही. माझ्या जीवाला काही बरं वाईट झालं तर सरकार जबाबदार राहील. हे सुडबुद्धीने झालं आहे. आम्ही काम करू नये असं त्यांना वाटतं. पण आम्ही घाबरणार नाही. आम्ही आमचं काम करत राहू, असा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे.