राजकारण

खुज्या नेतृत्वास लोकशाही आणि स्वातंत्र्याचे मोल काय समजणार; राऊतांचा शिंदे-फडणवीस सरकारवर टोला

पत्राचाळ घोटाळ्यामध्ये शिवसेना नेते संजय राऊत यांची 100 दिवसानंतर सुटका झाली. यानंतर संजय राऊत सक्रीय झाले असून सामना रोखठोकमधून शिंदे-फडणवीस सरकारवर रोखठोकमधून टीकास्त्र डागले आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : पत्राचाळ घोटाळ्यामध्ये शिवसेना नेते संजय राऊत यांची 100 दिवसानंतर सुटका झाली. यानंतर संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केल्याने ते नरमले असल्याच्या अनेक चर्चा झाल्या. परंतु, पुन्हा एकदा संजय राऊत सक्रीय झाले असून सामना रोखठोकमधून शिंदे-फडणवीस सरकारवर रोखठोकमधून टीकास्त्र डागले आहे. आज पाकिस्तान, चीन दिल्लीचे शत्रू नाहीत. सत्य बोलणाऱ्यांना राज्यकर्ते आपले शत्रू मानतात तेव्हा राज्यकर्त्यांनी आपला देशही खुजा केलेला असतो. त्याच लोकांनी दिल्लीचे पाणी गढूळ केले आहे! ते शुद्ध कसे होणार, असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे.

महाराष्ट्राचे राजकीय वातावरण किती गढूळ झाले आहे व अनेक लोक एकमेकांना कायमचे संपवायला निघाले आहेत, हे दि. 9 रोजी तुरुंगातून बाहेर पडताच पुन्हा जाणवले. आर्थर रोड तुरुंगाच्या मुख्य दरवाजाबाहेर एक लहानसा स्मृतिस्तंभ उभा केला आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात अनेक स्वातंत्र्यवीर आणि क्रांतिकारकांचे आर्थर रोड तुरुंगात वास्तव्य होते. त्या स्वातंत्र्यवीरांच्या स्मृती जतन करण्यासाठी हा स्तंभ उभा केला, पण लोकशाही आणि स्वातंत्र्याचा आता लवलेशही उरलेला नाही. राजकारण विषारी बनले आहे, तितके ते ब्रिटिश काळातही नव्हते. लोकशाही व संसदेचे फक्त नाव घेतले जाते. प्रत्यक्षात या दोन्ही संस्थांचे महत्त्वच नष्ट झाले.

तुरुंगात असताना नितीन गडकरी यांचे एक भाषण वाचनात आले. त्यांनी परखडपणे सांगितले की, ‘‘राष्ट्रीय राजकारणात पाऊल ठेवल्यानंतर मला आजवर अनेक माणसे भेटली. यात खूप मोठी वाटणारी माणसे खुजी निघाली तर प्रत्यक्षात जी माणसे मला छोटी वाटायची ती प्रत्यक्षात उत्तुंग निघाली. दिल्लीचे पाणी चांगले नाही.’’ गडकरी यांनी जे म्हटले ती आज जनभावना का बनली, याचे उत्तर दिल्लीच्या आजच्या वतनदारांनी शोधायला हवे, पण आजच्या वतनदारांना त्यांच्या मनासारखे उत्तर हवे असते. ते देणार नाहीत ते शत्रू ठरतात! पाकिस्तान, चीन हे दिल्लीचे शत्रू नाहीत. परखड बोलणारे, सत्य बोलणारे ज्यांना आपले शत्रू वाटतात तेव्हा त्या राज्यकर्त्यांनी आपला देशही खुजा केलेला असतो. अशा खुज्या नेतृत्वास लोकशाही आणि स्वातंत्र्याचे मोल काय समजणार, असा टोला संजय राऊतांनी शिंदे-फडणवीस सरकारला लगावला आहे.

आर्थर रोड तुरुंगाच्या मुख्य दरवाजाबाहेर स्वातंत्र्यवीरांच्या नावाने स्मृतिस्तंभ आहे, पण या तुरुंगात नक्की कोणते स्वातंत्र्यवीर मुक्कामास होते त्याची खास नोंद दिसत नाही! मुंबईतील ‘पीएमएलए’ म्हणजे मनी लॉण्डरिंगविरुद्धच्या न्यायालयात माझ्या जामीन मंजुरीचा निर्णय देताना कायद्याच्या व यंत्रणांच्या गैरवापराबाबत परखड निरीक्षणे नोंदवली. यंत्रणा आधी ‘आरोपी’ ठरवतात व त्यांना अटक केली जाते, हे त्यांनी सांगितले. ही एक प्रकारची द्वेष व कटुतेची भावना आहे.

राजकीय विरोधक जिवंत राहता कामा नये या विचारापर्यंत आजचे राज्यकर्ते पोहोचले हे सर्वस्वी चूक! राजकारणातली कटुता संपायला हवी असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. तुरुंगाबाहेर येताच, ‘फडणवीस हे बरोबर बोलले. कटुता संपायला हवी,’ असे समर्थन मी करताच ‘संजय राऊतांचे सूर नरमले’ असा अपप्रचार माध्यमांनी करावा हे दुर्दैव! महाराष्ट्रात रोज मारामाऱया व्हाव्यात, राजकीय सूडचक्रात लोक भरडले जावेत व त्यातून बातम्यांचे पीक निघावे हे जबाबदार माध्यमांचे काम नाही. राज्यकर्त्यांना विरोधकांनी भेटूच नये हा विचार चुकीचा आहे. विधिमंडळाच्या अधिवेशनाआधी चहापानावर विरोधकांचा बहिष्कार हे शस्त्रही आता बोथट झाले आहे. लोकशाही व स्वातंत्र्याची तलवार धारदार ठेवण्याची जबाबदारी आता विरोधी पक्षांवरच आहे. त्यासाठी त्यांना तुरुंगात जावे लागले तरी चालेल! सध्या देश त्याच दिशेने निघाला आहे. आर्थर रोड तुरुंगाच्या बाहेर स्वातंत्र्यवीरांचा स्तंभ आहे. आज ते वीरही गुन्हेगार ठरवले गेले असते, असेही त्यांनी म्हंटले आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा